पनवेल : रात्री एक वाजेपासून तळोजा औद्योगिक क्षेत्रातील एम आणि व्ही ब्लॉकमध्ये वीज नसल्याने कारखाने डीझेलच्या जनरेटवर सुरू ठेवण्यात आले आहेत. तळोजा औद्योगिक क्षेत्रातील ज्या परिसरात वीज गायब झाली तेथे सर्वाधिक शितगृहे आणि बॉयलर असल्याने या आस्थापना विजेविना सुरू ठेवल्या जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे. विजेच्या या संकटामुळे तळोजातील उद्योग क्षेत्र धास्तावले आहे.
तळोजात एम ब्लॉकमध्ये ३० हून अधिक शितगृहे आहेत. तर, एम ब्लॉकमध्ये ६० हून अधिक कारखाने आहेत. रात्रीपासून वीज गेल्यानंतर जनरेटरवर कारखाने चाललेत. मात्र, १० तास उलटले तरी वीज न आल्याने स्थानिक वीज महावितरण कंपनीला संपर्क साधण्यात आला. तेथे कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने महावितरणच्या भांडुप येथील प्रकाशगड कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. तेथील वरिष्ठ अधिकाऱ्याने, कर्मचारी संपावर गेलेत, आम्ही काय करणार, असे उत्तर तक्रारदाराला दिले. यामुळे हताश झालेले उद्योजक जनरेटरवर अजून किती वेळ उद्योग सुरू ठेवावे? अशा पेचात अडकले आहे. 12 तासांनंतर जनरेटर सुरू ठेवल्यास जनरेटर गरम होऊन दुर्घटनेच्या शक्यतेने उद्योजक वीज कर्मचाऱ्यांचा संप तातडीने कसा मिटेल, याकडे लक्ष लावून आहेत.
रात्रीपासून तळोजा उद्योग क्षेत्रात वीज नसल्याने अनेक शीतगृहे आणि कारखाने ठप्प झाले आहेत. कारखानदारांना याचा फटका बसलाच आहे, परंतु सरकारचे महसुली उत्पन्न यामुळे बुडणार आहे. कारण यातील अनेक शीतगृहांमधील माल परदेशात निर्यातीसाठीचा आहे. सरकारने वीज कर्मचाऱ्यांच्या मागणीचा तातडीने विचार करावा, अशी प्रतिक्रिया टीएमएचे माजी अध्यक्ष संदीप डोंगरे यांनी दिली.
Tags
पनवेल