पनवेल परिसरातील ग्रामीण भागात पोपट्या पार्टीची धूम: गावठी वालांसह इतर साहित्यांना वाढती मागणी
पनवेल दि.१४(वार्ताहर) : दरवर्षी प्रमाणे यंदाही पनवेल परिसरातील ग्रामीण भागात पोपट्या पार्टीची धूम शेतासह फार्महाऊस वरती सुरु झाली असून या पोपटी पार्टीसाठी लागणाऱ्या गावठी वालांसह इतर साहित्याची बाजार पेठेत चांगलीच मागणी वाढली आहे.


              गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात असलेल्या ग्रामीण भागासह शेतात आणि फॉर्महाऊसमध्ये या वैशिष्टयपूर्ण व लज्जतदार पोपटीचा घमघमाट सुटला आहे. जिथ तिथ पोपटीचीच चर्चा व तयारी पहावयास मिळत आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यात गावठी वालाच्या शेंगांची वैशिष्टयपूर्ण व लज्जतदार पोपटीला वाढती मागणी मिळत आहे. पोपटी वालाच्या शेंगां भामरुडाच्या (भांबुर्डी) पाल्यात मडक्यामध्ये मोकळ्या आगीवर विशिष्ट पद्धतीने शिजविल्या जातात. त्यामध्ये कांदा व बटाटा तसेच अंडी, चिकन घालून त्यांची लज्जत वाढविली जाते. यालाच पोपटी असे म्हणतात. सध्या तालुक्यात सर्वत्र पोपटी पार्ट्यांची धम्माल सुरु झाली आहे. मातीत पिकविलेल्या चवदार टपोर्या दाण्याच्या गावठी शेंगांच्या पोपटीला अधिक पसंती अाहे. मात्र हंगाम उलटून गेला तरी सध्या येथील स्थानिक गावठी शेंगा अजुन तयार झाल्या नसल्याने पर जिल्ह्यातून आलेल्या शेंगावरच खवय्यांना सध्या समाधान मानावे लागत आहे. स्थानिक गावठी वालांच्या पोपटीतील वालाच्या शेंगा कितीही खाल्या तरी त्या पोटाला बाधत नाही हे त्यांचे वैशिष्ट आहे. त्यामुळे सध्या ठिकठिकाणी शेतावर किंवा घराबाहेर मोकळ्या जागेत पोपटी पार्ट्यांची धम्माल पहायला मिळते. येथे काही ठिकाणी काव्यसंमेलन रंगतात तर गप्पा गोष्टींच्या मैफिलीमध्ये सुखदुःखाची देवाण घेवाणही होत आहे. त्यामुळे सध्या बाजापेठेत गावठी वालाच्या शेंगा, मडकी, चिकन, अंडी व पोपटी साठी लागणाऱ्या इतर साहित्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान अनेक वेळा मडकी उपलब्ध नसल्यामुळे पत्र्याच्या डब्यातही पोपटी बनत असून त्यालाही खवय्ये पसंती देत आहेत.थोडे नवीन जरा जुने