रिचार्जचे कापलेले पैसे परत मिळवण्याच्या नादात २ लाख ६५ हजार गमावलेपनवेल दि.२४ (वार्ताहर) : मोबाईल रिचार्जची बँक खात्यातून कट झालेली ३९९ रुपयांची रक्कम परत मिळविण्याच्या नादात एका सुरक्षारक्षकाने २ लाख ६५ हजार रुपये गमावल्याची घटना तळोजामध्ये उघडकीस आली आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील सुरक्षारक्षकाला गंडा घालणाऱ्या सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.तक्रारदार देवेंद्रदेव सिंग हा तरुण तळोजा येथील देवीचा पाडा येथे राहण्यास असून तो तोंडरे मच्छी कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. तो आपल्या कामावर असताना, त्याच्या सिमकार्डचे ऑटो रिचार्ज झाल्याचे तसेच त्याच्या खात्यातून ३९९ रुपये वजा झाल्याचा त्याला मेसेज आला. त्यामुळे त्याने गुगलवरून कंपनीचा कस्टमर केअर नंबर मिळवून त्यावर संपर्क साधला. त्यानंतर त्याने समोरील व्यक्तीला त्याच्या मोबाईलच्या रिचार्जचे ३९९ रुपये आपोआप कट झाल्याचे सांगून पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल, अशी विचारणा केली. यावेळी चोरट्याने त्याला एक लिंक पाठवून ती इन्स्टॉल करण्यास सांगितले.
 त्यानुसार केले असता देवेंद्रदेवच्या खात्यातून काही सेकंदात १ लाख ६५ हजार रुपये वजा झाले. त्यानंतर सायबर चोरट्याने त्याला दुसऱ्या बँकेच्या खात्याची माहिती टाकण्यास भाग पाडून त्यात ओटीपी टाकण्यास सांगितले. त्यानंतर देवेंद्रदेवच्या दुसऱ्या बँक खात्यातूनही १ लाख रुपये वजा झाले. अशा पद्धतीने चोरट्याने त्याच्या दोन्ही बँक खात्यातून २ लाख ६५ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचे लक्षात आल्यानंतर देवेंद्रदेवने दोन्ही बँक खाते बंद करून तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


थोडे नवीन जरा जुने