पनवेलमध्ये महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन







काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याबद्दल केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी आज पनवेलमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले होते त्याला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येवन छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून धरणे आंदोलनाला सुरुवात केली.



यावेळी केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी स्वाक्षरी मोहिम सुद्धा राबविण्यात आली होती याला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व या स्वाक्षरी मोहिमेमार्फत केंद्र सरकार, भाजप यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा चारुलता टोकस, जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हासंपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरिष घरत, मा. आ. बाळाराम पाटील, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील, उपाध्यक्ष नंदराज मुंगाजी, काँग्रेस नेते आर. सी. घरत, हेमराज म्हात्रे, काशिनाथ पाटील, हेलमता म्हात्रे, श्रुती म्हात्रे, अर्चना कुळकर्णी, विद्या चव्हाण, एकनाथ म्हात्रे, डी. एन. मिश्रा, विश्वास पेटकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव, नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, नारायणशेठ घरत, कृष्णकांत कदम, शशिकांत बांदोडकर, वैभव पाटील, मा. नगरसेवक रवींद्र भगत, मिलींद पाडगावकर आदींसह महाविकास आघाडीचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.



यावेळी बोलताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याबद्दल मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी व राहूल गांधी यांच्या समर्थनार्थ आज महाविकास आघाडीतर्फे धरणे आंदोलन छेडण्यात आले असून या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला जाहीर इशारा आहे त्यांनी केलेली कृती ही अत्यंत निंदनीय आहे. मोदी सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळेच तसेच राहूल गांधी यांनी देशभरात काढलेल्या रॅलीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकरली असून देशातील वातावरण बदलत चालल्याने मोदी सरकारने हे निंदनीय कृत्य केले आहे. 


याचा देशभरातून निषेध करण्यात येत असल्याचे सांगितले. तर यावेळी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्क प्रमुख बबन पाटील यांनी सुद्धा केंद्र शासनाचा निषेध करीत आगामी काळात जनता मोदी सरकारला घरात बसविल्याशिवाय राहणार नाही. आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असल्यानेच सत्तेत बसलेले सत्ताधारी हे छोट्या-छोट्या कारणावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. परंतु जनताच त्यांना धडा शिकवेल असे त्यांनी सांगितले. तर यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी सुद्धा केंद्राचा निषेध करत मोदी सरकारने केलेली कृती ही अत्यंत क्लेशदायक आहे. यातूनच त्यांची हिटलरशाही दिसून येत आहे. आगामी काळात जनताच त्यांना कायमचे घरी बसवेल असे त्यांनी सांगितले.


थोडे नवीन जरा जुने