गरजूंना वैद्यकीय उपचारासाठी मदतीच्या हातांची गरज- आ.प्रशांत ठाकूर रोटरीच्या वैद्यकीय सेवांचा शुभारंभ





पनवेल( वार्ताहर)- आर्थिक परिस्थितीमुळे आज अनेक जण उपचार घेत नाहीत,परंतु ज्यांना उपचार घ्यायचे आहेत अशा गरजूंच्या वैद्यकीय उपचारासाठी मदतीचे हात पुढे आले पाहिजेत असे मत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल डायग्नोपेन यांच्यावतीने खांदा कॉलनी येथील रोटरी मेगा मेडिकल सेंटरमध्ये रोटरीच्या विविध आरोग्यसेवांच्या शुभारंभ प्रसंगी केले. 
          या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, डॉ. गिरीश गुणे, रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन विलास कोठारी,डॉ.अनिल परमार,सतीश बनवट,प्रफुल्ल कोठारी आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते फित कापून डायलेसिस सेंटर,डायग्नोस्टिक सेंटर,दातांचा दवाखाना, सोनोग्राफी, रक्त तपासणी या कमीत कमी खर्चाच्या वैद्यकीय सेवांचा प्रारंभ करण्यात आला.




        यापुढे बोलताना आ.प्रशांत ठाकूर म्हणाले,पनवेलचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढत आहे. समाजामध्ये इतरांवरती अवलंबून राहण्याची संख्या मोठी आहे. आजारपणही वाढत आहेत, यासाठी केंद्र व राज्य सरकार मदत करेल. आरोग्य विषयी त्यांच्याही काही योजना आहेत त्याचा लाभही घेता येईल परंतु समाजामध्ये गरजू असणाऱ्या रुग्णांसाठी रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल हे सामाजिक बांधिलकी म्हणून आज वैद्यकीय सेवा जनतेला देत आहे. आयुष्य जगत असताना आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचे आहे यासाठी कृतीची जोड असली पाहिजे असे कार्य रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल करत असल्याचे त्यांनी सांगितले.


       यावेळी आ. प्रशांत ठाकूर यांनी या रोटरी सेंटरमध्ये डायलेसिस करणाऱ्या एका रुग्णाचा एक वर्षाचा खर्च मी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
          रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन विलास कोठारी यांनी, गरजू रुग्णांना अल्प दरामध्ये वैद्यकीय सेवा देण्याचे आमचे स्वप्न होते,ती स्वप्नपूर्ती आज पूर्ण होत आहे. सामाजिक बांधिलकीतून हा प्रकल्प आम्ही राबवत असून आयजीपीएल कंपनीने आम्हाला सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.अनिल परमार यांनी रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेलतर्फे हॉस्पिटल उभारण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजीवन यांनी मानले.


थोडे नवीन जरा जुने