पनवेल दि. १२ (वार्ताहर) : पैशाअभावी रुग्णाला उपचाराकरिता दाखल करून न घेणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनाला शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी झटका देत वठणीवर आणले आहे.
आदिवासी समाजातील निलेश जाधव या गरीब मुलाचा माणगाव येथे अपघात होऊन तो जखमी झाला होता. माणगाव येथील हॉस्पिटल प्रशासनाने केवळ प्रथमोपचार करून त्याला कामोठे एमजीएम येथे जाण्याचा सल्ला दिला. परंतु पैसे नसल्यांने कामोठे एमजीएम प्रशासन त्याला दाखल करून घेत नसल्याने तो रुग्णालयाबाहेर बसून होता.
ही बातमी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे याना कळताच त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पदाधिकारी मंगेश रानवडे, वैभव लोंढे, कुमार नलवडे आणि कार्यकर्त्यांनी एमजीएम हॉस्पिटल कामोठेला धडक देऊन प्रशासनाला जाब विचारला आणि तात्काळ निलेश जाधव या गरीब मुलाला उपचाराकरिता दाखल करून घेण्यात आले.
Tags
पनवेल