फॉनच्या टीमचा आगळा वेगळा स्तुत्य उपक्रम.
निसर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमींकडून फॉनच्या उपक्रमांचे कौतुक.
उरण दि ८(विठ्ठल ममताबादे )
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक ०७ मार्च २०२३ रोजी फ्रेंड्स ऑफ नेचर या निसर्ग प्रेमी, पर्यावरण प्रेमी संस्थेच्या वतीने आगळीवेगळी धुळवड साजरी करण्यात आली.फ्रेंड्स ऑफ नेचर,(फॉन) चिरनेर उरणचे सदस्य व काही समविचारी निसर्गमित्र यांना सोबत घेऊन संघटनेचे पदाधिकारी सदस्यांनी या वर्षीही वन्यजीव अधिवासातील पाण्याच्या मृत पावलेल्या झऱ्यांना नवसंजीवनी देण्याचे कार्य केले.
एक आगळीवेगळी धुळवड व फॉनची ज्युनियर सदस्य कु.सृष्टी ठाकूर च्या वाढदिवसाचे औचित्य साधून पशु पक्षांसाठी पाण्याचे स्रोत निर्माण करून त्यांचे तहान भागविण्याचा प्रयत्न या सामाजिक उपक्रमातून करण्यात आला.
उरण तालुक्यातील चिरनेर बापदेव परिसरातील पेरीचे पाणी या पाणवठ्यावर धुळवडीच्या दिवशी श्रमदान करून तिथे झऱ्यास पुनर्जीवित केले.या पाणवठ्याचा अनेक वर्षापूर्वी तिथे असणाऱ्या आदिवासी कातकरी समाजाच्या वस्तीकडून पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होत होता पण आता त्या पाणावठ्याचे पाणी तेथील आदिवासी बांधव वापरत नसल्याकारणाने हा पाणवठा गाळाने बुजला गेला होता.मागील वर्षीही संस्थेने त्यातील गाळ काढून वन्यजीवांच्या पाण्याची व्यवस्था केली होती. सदर परिसरात अनेक दुर्मीळ वन्यजीवांचा वावर व अस्तित्व अजूनही टिकून आहे.
व त्यात अनेक जीव असे आहेत ज्यांचे अस्तित्वच देशाच्या इतर भागातून नष्ट होत चालले आहेत.उरणच्या सर्व भागात विकासाच्या नावाखाली जी निसर्गाची जी भयानक कत्तल होतेय, वणवे लावून सर्व वनसंपदा नष्ट करून व डोंगरातील माती चोरून त्यांना उघडे - बोडके करून त्यांचं सपाटीकरण करून निसर्गाची जी अपरिमित हानी केली जातेय त्याची झळ मानवाबरोबर इतर वन्यजीवांना ही भोगावी लागतेय.काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रांत उरण वायू प्रदूषणा च्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहचलेला आहे.ही बातमी वाचून अजून होळीमध्ये किती
वृक्षांचा आपण बळी देणार ? असा सवाल संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.हिंदू धर्मानुसार प्रतीकात्मक होळी साजरी करू शकतो.बदलत्या काळात आपण आपल्या वागण्यात जसे बदल करुन घेतलेत तसे विचारात ही बदल घडवण्याची हीच ती वेळ आहे.
निसर्गावरचा ताण काही प्रमाणात कमी व्हावा असा या कार्यक्रमा मागील स्पष्ट हेतू असल्याचे फॉनच्या पदाधिकारी सदस्यांनी सांगितले.यावेळी फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) संस्थापक -अध्यक्ष जयवंत ठाकूर,उपाध्यक्ष राजेश पाटील,सचिव-निकेतन ठाकूर,गोरख म्हात्रे,राकेश म्हात्रे,राकेश शिंदे,कु.प्रणव गावंड,दिनेश चिरनेरकर,कु.सृष्टी जयवंत ठाकूर,कु.रुद्र राजेश पाटील आदी फॉन संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
Tags
उरण