वृक्षांची वणव्या मुळे जाळून होतेय सर्रास पणे कत्तल! पर्यावरणास धोक्याची घंटा






वृक्षांची वणव्या मुळे जाळून होतेय सर्रास पणे कत्तल! पर्यावरणास धोक्याची घंटा

काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : २३ एप्रिल 

              मागील अनेक वर्षांपासून वणवा लावण्यांची विचित्र पद्धत रुढ झाली असल्यामुळे रस्त्यावरच्या कडेला उभ्या असलेल्या या वृक्षांना आगी लावून जाळण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. त्यामुळे लोकांना सावली देणारे व शुद्ध निसर्ग वायु प्रदान करणार्‍या वृक्षांची संख्या दिवसेंदिवस घटत असून, याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. नागरिकांनाच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांना मोफत प्राणवायू देणार्‍या या वृक्षांचा र्‍हास होणे चिंताजनक आहे. 



              वृक्षांच्या या प्रकारे कत्तलीने तालुक्यातील पावसाळय़ात पडणार्‍या पावसाचे प्रमाण सुध्दा दरवर्षी घटत आहे. सातत्याने पाऊस कमी होत असल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊन शेती उत्पन्नात घट, तसेच पिण्याच्या पाण्याच्या संकटांनासुद्धा सामोरे जावे लागत आहे. काही नागरीक डोळय़ात धूळफेक करून रस्त्याच्या कडेवरची झाडे बुडातून जाळून नष्ट करीत आहेत




. खालच्या भागात जाळून कमजोर करण्यात आलेली ही झाडे कोसळून जीवित हानी होण्याची दाट शक्यता असते. झाडे तोडण्याची परवानगी कोणालाही मिळत नाही.परंतु शेतकर्‍यांशिवाय इतर काही लोकांनी मात्र ही झाडे तोडण्यासाठी नामी शकल काही वर्षापासून लढविणे सुरू केले आहे. रस्त्यालगतची ही झाडे कापली, तर चटकन वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात येते. त्यामुळे ही झाडे कापण्याऐवजी रात्रीच्या वेळी त्या झाडांच्या बुडातील भागाजवळ काडीकचरा टाकून तो पेटविला जातो, तर काही झाडे वणव्या मुळे जळाली जाते.


 झाडाचा बुडातील भाग जळाल्यामुळे साहजिकच हे झाड कोसळते. हे झाड कोणी जाळले नसून, वणवा लागल्यामुळे पडले, हे दाखविण्यासाठी प्रवृत्ती निर्माण झाली आहे. त्यांच्या या कृत्यामुळे वनसंपत्ती, रस्त्यालगतची सावली नष्ट होऊन पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे मात्र हे रोखणे मोठे आव्हान ठरत आहे.



     


फोटो कॅप्शन : वणवा लागल्यामुळे वृक्ष जळून खाली पडलेला दिसत आहे ( छाया : काशिनाथ जाधव ,पाताळगंगा
थोडे नवीन जरा जुने