पनवेल दि.१३ (वार्ताहर) : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण परिसरातील नागरिकांच्या पाचवीलाच पूजले आहे. येथील कासाडी नदी कायम प्रदूषणाच्या मगरमिठीत असते. त्यापाठोपाठ आता परिसरातील नालेही प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे पाहायला मिळत आहे. या नाल्यांमध्ये लाल, गडद रंगाचे पाणी सतत वाहत असते.
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सुमारे ९०० हून अधिक लहान-मोठे कारखाने या ठिकाणी आहेत. या वसाहतीला लागूनच आजूबाजूला तळोजा, नावडे, पेंधर, तोंडरे, देवीचा पाडा, पडघा यासारखी गावे आहेत. या आजूबाजूला राहणारे नागरिक, लोकवस्तीला या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका सातत्याने बसत आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखाने प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या देखरेखीखाली येतात. त्यामुळे या मंडळाने प्रदूषण रोखण्यासाठी रोखठोक पावले उचलणे गरजेचे आहे. परिसरात नेहमीच संध्याकाळनंतर वातावरणात एक कुजकट वास पसरलेला असतो. डोके सुन्न होऊन जाते. खारघर, कळंबोली, कामोठेसारख्या आजूबाजूच्या वस्तींचा श्वासही या प्रदूषणाने कोंडलेला असतो.
कोट - तळोजा औद्योगिक क्षेत्रात वाढत जाणाऱ्या प्रदूषणाबाबत आम्ही नेहमीच जनजागृती करत आलेलो आहोत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर ठोस कारवाई करावी. - मंगेश रानवडे, खारघर - तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशन.
Tags
पनवेल