पनवेल दि . १४ (वार्ताहर) : आमदारांच्या कार्यालयात धान्य व कपड्यांचे वाटप सुरू असल्याचे भासवून दोघा भामट्यांनी एका ७० वर्षीय वृद्ध महिलेजवळचे ५० हजार रुपये किमतीचे दागिने लुबाडून नेल्याची घटना पनवेलमध्ये घडली असून पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणातील दोघा भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
या घटनेत लुबाडल्या गेलेल्या वृद्ध महिलेचे नाव शाबिरा इस्माईल खान असे असून ती पनवेलमध्ये राहण्यास आहे. शाबिरा खान ही पनवेलमधील उरण नाका येथील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यालयाजवळून पायी चालत बाजारात जात होती.
या वेळी एका भामट्याने तिला अडवून आमदार साहेबांच्या कार्यालयात धान्य व कपड्यांचे वाटप चालू असल्याचे सांगितले. तसेच तिला धान्य व कपडे आणून देण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या दुसऱ्या भामट्याने तिला तीन वेफरचे पाकीट व २०० रुपये देऊन तुम्ही गरीब दिसले पाहिजे, नाही तर तुम्हाला सामान देणार नाहीत, असे सांगून त्यांना गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी व पैसे काढण्यास भाग पाडले. याचवेळी भामट्याने शाबिरा खान हिचे दागिने व रोख रक्कम हातचलाखीने चोरून रिकामी पिशवी त्यांच्या बॅगेत टाकली.
त्यानंतर दोघे भामटे त्या ठिकाणावरून पसार झाले. काही वेळानंतर शाबिरा खान हिने बॅगेत ठेवलेली दागिन्यांची पिशवी तपासली असता, त्यात दागिने व रोख रक्कम नसल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Tags
पनवेल