-आमदार महेश बालदी यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
पनवेल (प्रतिनिधी) नेरुळ - उरण रेल्वे लवकरच धावणार आहे. त्यामुळे या मार्गावर असलेल्या स्थानकांची महसूल त्याचबरोबर ऐतिहासिक व पारंपारिक गावांनुसार ओळख कायम राहावी, त्या अनुषंगाने रेल्वे स्थानकांना नावे देण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे आज (दि. २३ मे ) दिल्ली येथे भेट घेऊन केली.
यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, बोकडवीरा ग्रामसुधार मंडळाचे अध्यक्ष व सरपंच मनोज पाटील, नवघर ग्रामपंचायतीचे माजी उप सरपंच रवी वाजेकर, धुतूम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शरद ठाकूर आदी उपस्थित होते.
मुंबईला थेट उरण शहराशी जोडणाऱ्या, बहुप्रतीक्षित नेरूळ-उरण रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उभारणीचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे सध्या नेरूळ ते खारकोपर या टप्प्यात धावणारी नेरूळ-उरण रेल्वे काही दिवसांतच थेट उरणला पोहोचणार आहे. हा नवीन मार्ग सुरू झाल्यानंतर, सीएसटीहून रेल्वेने थेट उरणला जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या महिनाभरात नेरूळ-उरण रेल्वे सुरू होण्याचे संकेत रेल्वेकडून मिळाले आहेत.
Tags
पनवेल