मनसेची एम एस ई बी कार्यालयावर धडक .
अधिकाऱ्यांसमोर पनवेल आणि उरण तालुक्यातील प्रश्नांचा वाचला पाडा.. !
उरण दि 20(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उत्तर रायगड जिल्ह्यातर्फे जिल्हाध्यक्ष संदेश भाई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणाचे कार्यकारी अभियंता सतीश सरोदे यांच्यासमोर पनवेल तसेच उरण तालुक्यातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा पाडा वाचून दाखवला. पनवेल तसेच उरण तालुक्यात मागील काही दिवसांपासून वीज पुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून नागरिकांच्या वीजबिलात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
पावसाळा तोंडावरती आला असताना जर महावितरणाची ही परिस्थिती असेल तर रायगड सारख्या अतिसंवेदनशील जिल्ह्यामध्ये पावसाळ्यामध्ये विजेची नक्की काय परिस्थिती असेल असा सवाल मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना केला. तसेच त्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये लोकसंख्या वाढत असून वीज पुरवण्याची क्षमता जुनीच असल्यामुळे ट्रान्सफॉर्मर तसेच वीज वाहिन्यांवर अधिकचा भार येऊन वीज पुरवठा खंडित होत आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्याच्या सूचना या वेळी मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या. तसेच पावसाळ्यात नागरिकांना विजेच्या कोणत्याही समस्येला सामोरे न जाण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्या गोष्टींची पूर्वतयारी करण्यात आली आहे, याचा आढावा यावेळी घेण्यात आला.
तसेच महिला पदाधिकारी स्वरूपा सुर्वे,सोनल कदम, मनीषा देशमुख,शोभा गोरीवले,प्रज्ञा पाटील, मनीषा नायक व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
उरण