तळोजा औद्योगिक वसाहतीमधील पाणी संकटामुळे उद्योजकांच्या संघटनेमधील २५ कारखानदारांनी तळोजातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) कार्यालय गाठले. या कार्यालयातील अधिका-यांना भेटून संतापलेल्या उद्योजकांनी 'पाण्याविना उद्योग कसे चालवायचे' असा सवाल केला
. दिड ते दोन हजार रुपयांना पाण्याचा एक टँकर खरेदी करून उद्योग चालविणे कठीण झाले असून एमआयडीसी पाणी नाही देऊ शकतं, असं एकदा जाहीर करावे. म्हणजे कारखाने बंद करण्याचा विचार उद्योजक करतील असा संतापजनक प्रश्न उद्योजकांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला. उद्योजकांच्या पवित्र्यानंतर एमआयडीसीच्या स्थानिक अधिका-यांनी वरिष्ठांसोबत उद्योजकांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये साडेतीनशेहून अधिक रासायनिक कारखान्यांना ५३ दश लक्ष लीटर पाणी लागते. हा पाणी पुरवठा बारवी धरणातून केला जातो. मागील दोन वर्षापासून उद्योजकांना पाणी पुरवठा सुरळीत होता. परंतू ५३ दश लक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता असताना अवघे ३८ एमएलडी पाणी पुरवठा होत असल्याने एमआयडीसीच्या अधिका-यांना विविध क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने पाणी पुरवठा करावा लागतो. या सर्व स्थितीमुळे • मोठ्या आणि लघु उद्योगांचे हाल झाल्याची माहिती उद्योजकांची संघटना टीएमएचे खजिनदार दिलीप परुळेकर यांनी दिली.
Tags
पनवेल