भाजपा प्रदेश सरचिटणीस तसेच कोकण विभाग प्रभारी पदी विक्रांत पाटील यांची निवड


भाजपा प्रदेश सरचिटणीस तसेच कोकण विभाग प्रभारी पदी विक्रांत पाटील यांची निवड
पनवेल दि.०५ (संजय कदम) : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच राज्य पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे अत्यंत विश्वासु पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्यावर अतिशय महत्त्वाच्या अशा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाची महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्यावरती कोकण विभागाच्या प्रभारी पदाची सुद्धा विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे.          विक्रांत पाटील यांनी यापूर्वी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश अध्यक्ष अश्या महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. राज्यभरात असणारा दांडगा जनसंपर्क, राज्यभरात लाखो किलोमीटर केलेला प्रवास व सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे ही महत्वपूर्ण जबाबदारी विक्रांत पाटील यांच्यावरती सोपविण्यात आली आहे. राज्यभरात यापूर्वी अनेक अभियाने, आक्रमक आंदोलने यामध्ये विक्रांत पाटील यांनी राज्यातील युवांचे प्रश्न सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर वेळप्रसंगी आक्रमक पवित्रा घेत अनेक आंदोलने ही केली आहेत. विविध प्रकराची आव्हाने पेलण्याची क्षमता असल्यामुळे तसेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष, आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विकांत पाटील यांच्यावरती विश्वास दाखवत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. पुढील काळातील निवडणूकांचा विचार करता ही निवड पक्षाला मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानली जात आहे तसेच या नियुक्तीने कोकणातील कार्यकर्त्यांमध्ये तसेच राज्यभरातील युवा वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.थोडे नवीन जरा जुने