दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर





दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर 

पनवेल (प्रतिनिधी) श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल महानगरपालिका यांच्या सयुंक्त विद्यमाने एमकेसीएल अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित रायगड विभाग यांच्या सहकार्याने बुधवार, दि. ७ जून २०२३ रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी “भरारी २०२३ – तुमच्या करिअरला द्या एक परिपूर्ण भरारी” या आशयाखाली करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 



दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्याकरिता पनवेल तालुक्यातील सर्व MS-CIT केंद्रांच्या माध्यमातून विनाशुल्क हे शिबीर आयोजित केलेले आहे. या शिबिरासाठी महाराष्ट्र राज्यातील नामवंत व्याखाते, लेखक व करीअर मार्गदर्शक माननीय प्रो. विजय नवले सर विद्यार्थ्यांना या निमित्ताने मार्गदर्शन करणार आहेत. सकाळ, लोकमत, पुढारी, प्रभात, सामना, टाईम्स ऑफ इंडिया आदी वर्तमानपत्रातून करियर विषयावर ५०० हून अधिक लेख लिहिले आहेत, तसेच करियर विषयातील करियर पाथ फाईनडर या सुप्रसिद्ध करियर तक्त्याचे लेखन केले आहे. आतापर्यंत राज्यभर २५०० हुन अधिक करियर व्याख्याने करणारे सुप्रसिद्ध करियर मार्गदर्शक बहुमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. 


एमकेसीएलचे डेप्युटी जनरल मॅनेजर मा. श्री. दिपक पाटेकर सर प्रत्यक्ष कार्यानुभवातून पदवी कशी मिळवावी यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. बीबीए पासून ते बीएस्सी कम्प्युटर सायन्स या पदव्या देखील आपण काम करता-करता कशा मिळवू शकतो यासंदर्भात “कमवा आणि शिका” तसेच एमकेसीएलचे जॉब स्कील कोर्सेस (क्लिक कोर्स) या बद्दल आपल्याला माहिती कळू शकेल. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर मोफत मार्गदर्शन करण्याचं काम एमकेसीएलच्या रायगड जिल्ह्यातील सर्व एमएस-सीआयटी आणि क्लिक सेंटरच्या माध्यमातून होत आहे. या शैक्षणिक मेजवानीचा दहावी, बारावी तसेच महाविद्यालयीन सर्व विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेल तालुक्यातील सर्व एमएस-सीआयटी आणि क्लिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.



थोडे नवीन जरा जुने