उरण दि २(विठ्ठल ममताबादे )कामगार क्षेत्रात पाय ठेवलेल्या समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेने अतिशय कमी कालावधीमध्ये जे.एन.पी.टी परिसरात आपला ठसा उमटवला असून स्पीडी मल्टिमोडल्स कंपनी सोबत झालेल्या यशस्वी करारानंतर जे.एम.बक्षी या नावाजलेल्या कंपनीमध्ये साफसफाई कामगारांचा करार संघटनेच्या कार्यालयात संपन्न झाला. या प्रसंगी समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष अतुल भगत , जे.एम.बक्षी कंपनीतर्फे आशिषकुमार जोशी, ठेकेदार सद्गुरू कृपा फ्रेट सर्व्हिसेस चे किशोर कडू, गजानन शिंदे, अभिजित पाटील तसेच कामगार संघटनेतर्फे संघटनेचे चिटणीस अनिल भोईर, खजिनदार नैनेश म्हात्रे, विकास घरत आदी पदाधिकारी तसेच कामगार वर्ग उपस्थित होते.
याच कंपनीमध्ये मागील कामगार संघटनेने करार करताना कंपनीची बाजू घेत कामगारांची फसवणूक केली होती. त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या ६ ते ७ कामगारांना त्यांच्या सेवानिवृत्तीचा कुठलाही मोबदला मिळाला नव्हता. मेडिकल, ग्रॅच्युइटी, बोनस, वार्षिक सुट्ट्या या संदर्भात अध्यक्ष अतुल भगत यांनी कंपनी प्रशासनासोबत यशस्वी पाठपुरावा करून कामगार क्षेत्रात नवीन असतानाही अगोदरच्या करारामध्ये नाकारलेल्या सर्व गोष्टी करारामध्ये समाविष्ट करून घेतल्या आहेत. त्यानुसार इतर फायदे होऊन सेवानिवृत्तीनंतर २,००,०००/- (दोन लाख रुपये ) रुपयांची वाढ तसेच कामगारांच्या
सेवानिवृत्तीनंतर रक्तातल्या नात्यातील एका व्यक्तीला कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरी, दुर्दैवी मृत्यु झालेल्या लक्ष्मण रमण ठाकूर यांच्या नातेवाईकांना पर्ल फ्रेट सर्व्हिसेस ने नाकारलेला मोबदला या सर्व गोष्टी अभ्यासपूर्ण रितीने पदरात पाडून घेतल्या आहेत. या करारामुळे कंपनीतून सेवानिवृत्त झालेले साफसफाई कामगार श्रीमती द्वारका पाटील आणि हिराबाई भगत ह्यांचा जवळपास वर्षभरापासून रखडलेला एक्स ग्रेशिया रुपये २,००,०००/ (दोन लाख रुपये) हे सुद्धा त्यांना मिळणार आहेत. त्यामुळे त्यांनी सुद्धा संघटनेचे आभार मानले आहेत ह्या सर्व गोष्टीमुळे जे.एम.बक्षी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या कराराचा दूरगामी परिणाम जे.एन.पी.टी परिसरात होणार असून अनेक कंपन्यांचे कामगार भविष्यात या संघटनेचे सभासद होतील असा विश्वास संघटनेचे चिटणीस अनिल भोईर यांनी ह्या कराराप्रसंगी व्यक्त केला.
Tags
उरण