पनवेल दि.२४ (वार्ताहर) : पनवेल शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना कळंबोली शहर तसेच रामदास शेवाळे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्त्या संध्याराणी पाटील यांच्या पुढाकाराने कळंबोली येथील एक्स्प्रेसवे उड्डाणपुलाखाली शिक्षण घेत असलेल्या ओपन एज्युकेशनच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात रामदास शेवाळे, संध्याराणी पाटील, वनिता रिटे, संजीवनी सोनवणे, आनंद माने, विराट पवार, सुभाष घाडगे, दीपक कारंडे, वैभव लोंढे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच गरीब-गरजू विद्यार्थ्यांना खडतर परिस्थितीमध्ये शिक्षणाचे पाठ देणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भविष्यात शिक्षणासाठी कोणतीही अडचण आल्यास रामदास शेवाळे प्रतिष्ठान विद्यार्थी व शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली. शिक्षणाचा सर्वांना समान अधिकार आहे.
मात्र काहींना परिस्थितीअभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागते. तरीही काहीजण त्या परिस्थितीवर मात करून खडतर परिस्थितीतही शिक्षण घेतात. त्याचबरोबर काही शिक्षकदेखील प्रामाणिकपणे अशा गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देतात. याबद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांचे मनापासून अभिनंदन करते, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या तथा शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या संध्याराणी पाटील यांनी व्यक्त केली.
Tags
पनवेल