आझाद कामगार संघटनेच्या प्रयत्नाला यश; कंत्राटी सफाई कामगारांच्या वारसांना मिळणार काम


आझाद कामगार संघटनेच्या प्रयत्नाला यश; कंत्राटी सफाई कामगारांच्या वारसांना मिळणार काम
पनवेल दि.२६ (वार्ताहर) : सिडको महामंडळाकडे काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांच्या वारसांना कामावर घेण्याचे प्राधिकरणाने मान्य केले आहे. विशेष मुख्य अभियंतांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत हे आश्वासन देण्यात आले. आझाद कामगार संघटनेच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे यामुळे सिडको भवन वर काढण्यात येणाऱ्या आक्रोश मोर्चा स्थगित केला असल्याची माहिती संस्थापक महादेव वाघमारे यांनी दिली.              सिडकोकडे आरोग्य, अभियांत्रिकी त्याचबरोबर सिडको रेल्वे प्रकल्पात जवळपास 700 पेक्षा जास्त कंत्राटी सफाई कामगार काम करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही सेवा बजावत असतानाही प्राधिकरणाने त्यांना अद्यापही कायम करून घेतलेले नाही. त्यांच्या न्याय हक्कासाठी आझाद कामगार संघटना लढा देत आहे. या संघटनेचे संस्थापक महादेव वाघमारे यांच्या पाठपुरामुळे 2017 पासून बंद असणाऱ्या पगारी रजा सुरू करण्यात आल्या. त्याचबरोबर चार वर्षाचे थकीत असलेले प्रत्येकी 38 हजार रुपये नवी मुंबईतील रेल्वे स्थानकावर स्वच्छता विषयक काम करणाऱ्या कामगारांना मिळवून दिले. नियम व कायद्यानुसार त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात या उद्देशाने आझाद कामगार संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे. गेल्या 27 वर्षांपासून साठ वर्षे पूर्ण केलेल्या कंत्राटी सफाई कामगाराच्या वारसाला सिडको मध्ये त्याच पद्धतीने कामावर घेण्याची प्रथा आहे. त्यानुसार वयोमानानुसार निवृत्त झालेल्या कामगारांच्या मुलांना किंवा कुटुंबातील व्यक्तींना काम मिळत आहे. परंतु सिडकोने या प्रथेला बगल देण्याचा एक प्रकारे घाट घातला होता. अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला आदेश काढून 60 वर्षावरील कामगारांना कामावर घेऊ नये असे सूचित केले होते. सानपाडा येथील रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या कामगारांच्या वारसांबाबत संघटनेच्या वतीने गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. परंतु सिडको कडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. यावरून प्राधिकरणाचे मनसुबे स्पष्ट झाले होते. एखादी प्रथा सुरू केल्यानंतर ती नियमानुसार बंद करता येत नाही या मुद्द्याच्या आधारावर आझाद कामगार संघटनेने या प्रश्नावर लढा देण्याचा निर्णय घेतला. याबाबत सिडको ने त्वरित निर्णय न घेतल्यास बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी सिडको भवन वर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा महादेव वाघमारे यांनी दिला होता. यामुळे सिडको ने नरमाईची भूमिका घेत मंगळवारी बैठक बोलावली होती. सिडको रेल्वे प्रकल्पाचे मुख्य अभियंत्यांच्या दालनात यावर चर्चा करण्यात आली.


 कंत्राटी सफाई कामगारांच्या वारसदारांना कामावर घेण्याबाबत सिडको सकारात्मक भूमिका आहे. आझाद कामगार संघटनेला सविस्तर निवेदन देऊन भूमिका मांडावी असे सांगण्यात आले. या संदर्भात लवकरच परिपत्रक काढले जाईल असे ठोस आश्वासन मुख्य अभियंत्यांकडून देण्यात आले. यावेळी रेल्वे प्रकल्पाच्या विशेष मुख्य अभियंता शीला करुणाकरण,अधीक्षक अभियंता प्रविण सेवतकर,कार्यकारी अभियंता मिलिंद रावराणे, सिडको कामगार अधिकारी भरत ठाकूर,सिडको सहायक सुरक्षा अधिकारी परशुराम गावडे,आझाद कामगार संघटनेकडून ऍड विजय कुर्ले, अध्यक्ष महादेव वाघमारे कामगार प्रतिनिधी राकेश बारगोटे, गीतेश गायकवाड, शिवदास आंबेकर; सिबिडी पोलीस ठाण्यातून चेतन अहिरे, कल्पेश लवटे उपस्थित होते


कोट - गेल्या अनेक वर्षांपासून सिडको मध्ये स्वच्छते विषयक सेवा देणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांच्या न्याय हक्कासाठी आझाद कामगार संघटना कटिबद्ध आहे. त्यांच्या वारसांना कामावर रुजू करून घ्यावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे. या करता सिडको भवनवर आक्रोश मोर्चाचा इशारा सुद्धा देण्यात आला होता. मात्र सिडको अधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत ठोस आश्वासन दिले आहे. त्याची पूर्तता लवकरात लवकर करावी अशी आमची न्याय मागणी आहे. - महादेव वाघमारे (संस्थापक/अध्यक्ष, आझाद कामगार संघटनाथोडे नवीन जरा जुने