पनवेल दि.१०(वार्ताहर): अभिनेते आणि अभिनेत्री अभ्यास करून, प्रचंड मेहनत घेऊन खरोखरच मनापासून भूमिका साकारत असतात. एखादी भूमिका साकारत असताना त्या कलाकाराला विशिष्ट कौटुंबिक पार्श्वभूमी, अनुभव असल्याचा गैरसमज प्रेक्षकांनी मनातून काढून टाकला पाहिजे. असा अनुभव असेल तर तो अभिनय होऊच शकत नाही हे लक्षात घेऊन कलाकारांच्या भूमिकेकडे पहावे, सरसकट शेरे प्रेक्षकांनी मारू नये असे मत ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात केतकीची भूमिका साकारणार्या शिल्पा नवलकर यांनी मांडले आहेत.
नवीन पनवेल येथील आचार्य अत्रे कट्ट्यातर्फे सिडको उद्यानात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी त्यांचा कलाप्रवास उलगडून दाखविला. त्या पुढे म्हणाल्या, सध्या समाजमाध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे दुसर्याचं ऐकून घेण्याची क्षमताच नाहीशी होत चालली आहे. खरं तर व्यक्तीला एकटेपणाच्या भावनेतून दिलासा द्यायचा तर त्या व्यक्तीचं शांतपणे ऐकून घेऊन नको ते सल्ले देणं टाळलं पाहिजे.
Tags
पनवेल