पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : मेव्हण्यांनी आपल्या दाजीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने संतप्त झालेल्या दाजीने आपल्या दोघा मेव्हण्यांच्या अंगावर गाडी घालत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना तळोजा भागात घडली आहे.
फैसल नाझीम अन्सारी (२६) असे या दाजीचे नाव असून तळोजा पोलिसांनी त्याच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. फैसल नाझीम अन्सारी हा गोवंडी येथे राहण्यास असून गत ५ मार्च रोजी त्याचा तळोजा फेज २ येथे राहणाऱ्या शहरीनसोबत निकाह झाला होता. लग्नानंतर फैसल आणि शहरीन या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. शिवीगाळ व मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचल्याने शहरीनच्या दोघा भावांनी तळोजा पोलीस ठाण्यात फैसलविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. या गोष्टीचा फैसलला राग आल्याने त्याने शहरीनच्या दोघां भावाच्या अंगावर आपली कार घातली. त्यानंतर त्याने आपली कार घेऊन पलायन केले.कारची धडक लागल्यामुळे शाहनवाज व मोहम्मद शाहवेझ या दोघांच्या डोक्याला, छातीला, पाठीला व हातापायांना गंभीर स्वरुपाच्या दुखापती झाल्याने त्यांनी पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी फैसलविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.