जुना ठाणा नाका रोडचे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्ग नामकरण करण्याची शिवसेनेचीमागणी
पनवेल दि.२९ (संजय कदम) : पनवेल महापालिकेच्या जुन्या मुख्यालयापासून ते नवीन मुख्यालयाला जोडणाऱ्या जुना ठाणा नाका रस्त्याचे नाव बदलून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्ग नामकरण करा अशी मागणी शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच यासंदर्भात प्रथमेश सोमण यांनी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनाही याबाबतचे पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे.
    
                  यासंदर्भात प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पनवेलचा सर्वागीण विकास होत असून महापालिका प्रशासनाने पनवेलचे सुशोभीकरण ही जोरदार करण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल प्रशासनाचे काम देखील आता अधिक जलद गतीने सुरू आहे. याबाबत नामांतरणाची एक प्रमुख मागणी आम्हाला आमच्या पक्षातर्फे आपणास करावयाची आहे. पनवेल मध्ये सध्याचे असलेले पालिका मुख्यालय (जुनी नगरपरिषद बिल्डिंग) ही रस्त्याच्या ज्या टोकापासून सुरु होते तो रस्ता पुढे ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहावरून प्रांत कार्यालयावरून सरळ पुढे मुंबई पुणे हायवे लगत असलेल्या आपल्या नवीन प्रस्तावित महापालिकेच्या कार्यालयापर्यंत जाऊन पोहोचतो. सदर रस्ता पहिल्यापासूनच जुना ठाणा नाका रोड या नावाने ओळखला जातो या रस्त्याचे असे कोणतेही अधिकृत नामकरण झाल्याची माहिती आम्हाला पालिकेतून मिळाली नाही किंवा नामकरण झाल्याचेही कधी ऐकिवात नाही. परंतु हा रस्ता आता पनवेल मधील एक महत्त्वपूर्ण रस्ता बनला असून पूर्णतः काँक्रिटीकरण केलेला रस्ता महापालिकेच्या जुन्या नवीन मुख्यालयाला जोडतो. या रस्त्याला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्ग असे नाव देऊन नामकरण करण्यात यावे अशी आमची आग्रही विनंती आहे. स्वातंत्र्य चळवळीतच नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक तथा साहित्यातही भरीव कामगिरी असणारे थोर क्रांतिकारक हिंदुहृदयसम्राट विनायक दामोदर सावरकर यांचे नाव या रस्त्याला मिळाल्यास त्या रस्त्याचे महत्त्व आणखी वाढणार आहे. महानगरपालिका, महापौर असे आपल्या रोजच्या वापरातील शब्दच मराठी भाषेला ज्यांनी दिले अशा सावरकरांच्या नावे सदरच्या रस्त्याचे नामकरण व्हावे अशी मागणी प्रथमेश सोमण यांनी निवेदनात केली आहे. यामागणी संदर्भात शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद सोनवणे, शहर संघटक अभिजीत साखरे, उपशहर प्रमुख अर्जुन परदेशी, विभाग प्रमुख आशिष पनवेलकर हे सुद्धा पाठपुरावा करणार असल्याची माहिती प्रथमेश सोमण यांनी दिली.  फोटो : प्रथमेश सोमणसह त्याचे सहकारी
थोडे नवीन जरा जुने