आरटीई निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मुदतवाढ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश
आमदार प्रशांत ठाकूर यांनी मानले मंत्री दीपक केसरकर यांचे आभार
पनवेल(प्रतिनिधी) सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता मुदतवाढ देण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश आले असून सदरची मागणी मंजूर केल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले आहेत.
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रे व दाखल्यांची पुर्तता करण्याबाबत होणारी पालकांची अडचण लक्षात घेता या समस्येवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले होते. शासकीय संप व इतर साप्ताहिक सुट्ट्यांमुळे शासकीय कार्यालये बंद राहिल्याने विद्यार्थ्याच्या पालकांना ऑनलाईन प्रक्रियेच्या विहीत मुदतीत दाखले न मिळाल्यामुळे महाराष्ट्र राज्यात आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार असल्याच्या आशेवर असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न केला नाही. त्यामुळे दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळणे कठिण होणार असल्याने आरटीई पात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत मुदतीची निर्माण होणारी अडचण दूर करावी, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नामदार दीपक केसरकर यांना मागणीतून केली होती.
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्र व दाखल्यांची पुर्तता करण्यात होणाऱ्या अडचणी दुर करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर यांना पत्राद्वारे केली आहे.
या मागणीचा गांभीर्याने दखल घेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सदर प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिली असून त्या संदर्भात शासनाकडून परिपत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रीया संपुर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडत (लॉटरी) बुधवार दिनांक ०५ एप्रिल ०२३ रोजी काढण्यात आली होती. निवड यादीतील बालकांचे प्रवेश मुदत दिनांक १३ एप्रिल २०२३ ते ०८ मे २०२३ पर्यंत होती, ती मुदतवाढ दिनांक १५ मे २०२३ पर्यंत देण्यात आली होती.
आता मात्र कागदपत्रांची तपासणी करणे व प्रवेश निश्चितीकरीता दिनांक २२ मे २०२३ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सदर वाढीव मुदतीच्या कालावधीतील दाखले (कागदपत्रे) ग्राह्य धरण्यात येणार आहेत, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ मिळाली असून पाल्य व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच शालेय शिक्षण विभागाचे आभार व्यक्त केले आहेत.
Tags
पनवेल