नैना परिक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक भूमिका - पालकमंत्री उदय सामंत पनवेल(प्रतिनिधी) नैना परिक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार प्रशांत ठाकूर व शिष्टमंडळाला दिले.
नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे. त्या अनुषंगाने व त्यांच्या मागणीनुसार आज मुंबईत मुक्तागिरी निवासस्थानी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या समवेत बैठक पार पडली. या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, यांच्यासह नगरविकास व सिडकोचे अधिकारी, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सुनिल पाटील, महेश पाटील आदी उपस्थित होते.
या बैठकीत शेतकऱ्यांची बाजू मांडतानाच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची पुनर्मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. २३ गावांच्या मंजूर अंतरिम विकास आराखडयातील 'क्षेत्रावर 'नैना' प्राधिकरणामार्फत ११ नगर रचना परियोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. आजपर्यंत त्यापैकी फक्त टिपीएस १ च्या कामाला सुरुवात झाली असून अन्य बाबत अत्यंत हलगर्जीपणे काम चालू आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले.
नैनाच्या टीपीएस योजना ज्या २३ गावांच्या हद्दीत येतात त्या गावांच्या गावठाणाच्या अंतर्गत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नैना प्राधिकरण म्हणजेच सिडकोने काम करण्याची आवश्यकता आहे. रस्ते, गटारे, पाणी पुरवठा आणि अन्य सोयीसुविधा अशा पायाभूत सोयीसुविधांचा विकास नैना प्राधिकरणाने करण्याची आवश्यकता आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठकीत बोलताना म्हंटले. यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी या अनुषंगाने सिडकोने यासाठी येणाऱ्या तीन महिन्याच्या आत सर्व गावांसाठी आवश्यक सोयीसुविधांचा आराखडा तयार करावा, असे निर्देश सिडकोला दिले.
सदर पायाभूत सुविधांसाठी सिडको, रायगड जिल्हा परिषद एकत्रित काम करून केंद्र शासन, राज्य शासन अथवा सिडको पैकी कोणाच्या निधीतून हि विकासकामे केली जातील या संदर्भात निर्णय घेतला जाईल असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी सांगितले. शेतकऱ्यांना ४० टक्के आणि नैना प्राधिकरणाला ६० टक्के हि योजना शेतकऱ्यांना मंजूर नाही. पूर्वीच्या नैना योजनेमध्ये शेतकऱ्यांना ६० टक्के आणि सिडकोला ४० टक्के मिळणार होते. पण आता अनेक ठिकाणी ४० टक्के एरियामध्ये २. ५ एफएसआय पूर्णपणे वापरला जात नाही असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले. त्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी सिडकोकडून खुलासा मागविला असता या संदर्भामध्ये विमानतळ प्राधिकरणाकडून केंद्रीय नागरी उड्डाण खात्याकडून या संदर्भातील लवकरच निर्देश येण्याची आवश्यकता आहे.
यावर मा. मुख्यमंत्री यांच्या मार्फत यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे, पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. या अनुषंगाने बोलत असताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी ६० टक्के विकसित जमीन शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे असा आग्रह धरला असता सिडकोकडून जर ६० टक्के जमीन शेतकऱ्यांना दिली गेली तर शेतकऱ्यांना ४० टक्के जमिनी व्यतिरिक्त अन्य सार्वजनिक आरक्षण विकसित करण्यासाठी सिडकोकडे निधी उरणार नाही, अशी खंत संजय मुखर्जी यांनी व्यक्त केली. त्यावर बोलत असताना किमान ५० टक्के विकसित जमीन शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे असा आग्रह आमदार प्रशांत ठाकूर यांनी धरला.
या जमिनी विकसित करत असताना बेटरमेंट चार्जेस लावण्यात येऊ नये असा सिडकोने तात्पुरता निर्णय घेतला असला तरी तो शासनाच्या निर्णयाच्या अधीन राहून घेतला आहे तरी शासनाने या बाबतीत तातडीने निर्णय जाहीर करावा अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. या संदर्भामध्ये नगरविकास विभागाने लवकरात लवकर अधिसूचना काढावी, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. या संपूर्ण परिसरामध्ये नैना गावठाण हद्दीत यूडीसीपीआर लागू करावा अशी मागणीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली त्यावर या संदर्भातील प्रस्ताव हा नगर संचालायन विभाग पुणे यांच्याकडे प्रलंबित असून तातडीने मंजूर करण्याचे निर्देशही पालकमंत्री उदय सामंत यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
तसेच या क्षेत्रामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये बेटरमेंट चार्जेस, यूडीसीपीआर या संदर्भामधले निर्णय शासनाकडून तातडीने घेतले जावेत आणि शेतकऱ्यांमधील अस्वस्था दूर व्हावी यासाठी नगरविकास विभागाचे उच्च अधिकारी आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत पुन्हा एक आढावा बैठक घेण्यात येईल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. येणाऱ्या कालावधीमध्ये नैना प्राधिकरणाच्या परिसरामध्ये जो विकास होणार आहे. तो लवकरात लवकर व्हावा आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या असलेल्या अडचणी दूर करणे याला नैना प्राधिकरणाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.
Tags
पनवेल