पनवेल, दि.11 (संजय कदम) ः पनवेल रेल्वे स्थानकात आलेल्या केरळ संंपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये आरपीएफ पनवेलच्या पथकाने तीन अनोळखी बॅगा हस्तगत केल्या असता त्या बॅगेमध्ये देशी-विदेशी मद्यसाठा आढळून आल्याने तो ताब्यात घेवून राज्य उत्पादन शुल्क विभाग, पनवेल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
आज आरपीएफ पनवेल निरीक्षकांना गुप्त माहिती मिळाली की ट्रेन क्र. 12217 केरळ संपर्क क्रांतीमध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निरीक्षक पनवेल यांनी एक पथक तयार केले ज्यामध्ये सहायक उपनिरीक्षक सिद्धेश्वर पाटील, कॉन्स्टेबल राज कपूर, कॉन्स्टेबल मस्तराम मीना आणि एसआयबी पनवेल यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचार्यांचा समावेश होता
. सदर गाडी पनवेल स्थानकावर आल्यावर, सदर पथकाने ट्रेनचे सर्व डबे तपासले असता त्यांना आढळले की कोच - बी 1 च्या बर्थ क्रमांक 71 खाली 03 बॅग पॅक संशयास्पद स्थितीत दिसल्या. या संदर्भात डब्यातील प्रवाशांंना विचारणा केली असता कोणीही याबाबत माहिती दिली नाही. तसेच डब्यात एकही संशयित प्रवासी दिसला नाही. त्यामुळे बॅग संशयास्पद वाटल्याने योग्य कारवाईसाठी बॅग कार्यालयात आणल्या व राज्य उत्पादन शुल्क विभागाने बॅग उघडली असता त्यात विविध देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या ज्याची किंमत जवळपास 21720 इतकी आढळून आल्याने सदर बॅगा राज्य उत्पादन शुल्क विभाग पनवेलकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
Tags
पनवेल