पळस्पे उड्डाणपुलाखाली रस्त्याची चाळण

पळस्पे उड्डाणपुलाखाली रस्त्याची चाळण
पनवेल दि.१८ (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील पळस्पे गावाच्या उड्डाण पुलाखाली सर्व्हिस रोड वर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे सतत अपघात होत आहेत. त्याचप्रमाणे या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी ये जा करत असतात. भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून संबंधित प्राधिकरणाने योग्य ते उपाय करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.             मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरणाच्यावेळी पळस्पे गावाजवळ उड्डाणपूल उभारला गेला पण त्याचवेळी पावसाळी पाण्याचा निचरा न केल्यानं उड्डाणपुलाखाली सतत पाणी साठत आहे. त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच सेवा रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्यामुळे शालेय विद्यार्थीयांसह नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये जा करावे लागत आहे. या संदर्भात पळस्पे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच चंद्रकांत भोईर व ग्रामविकास अधिकारी यांनी अनेकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग कार्यालयाशी सतत पत्र व्यवहार करूनही आजवर आमच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचे सांगितले. तरी लवकरात लवकर दखल न घेतल्यास ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा नागरिकांनी दिला आहे.


थोडे नवीन जरा जुने