बंद असलेल्या सोनबा येलवे पाणपोईची तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा उपोषण करू पत्रकार मित्र असोसिएशनची प्रशासनाकडे मागणी


बंद असलेल्या सोनबा येलवे पाणपोईची तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा उपोषण करू
पत्रकार मित्र असोसिएशनची प्रशासनाकडे मागणी

पनवेल / प्रतिनिधी
     भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निस्सीम भक्त म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो त्या सोनबा येलवे यांच्या नावाची पनवेलमधील एक आठवण म्हणून याठिकाणी हि पाणपोई सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शहरातील तसेच तालुक्यातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी उभारण्यात आलेल्या सोनबा येवले पाणपोई सुरु करण्यात आली होती.  गेल्या काही दिवसापासून पनवेल एसटी डेपो समोरील पनवेल महानगरपालिकेची सोनबा येलवे पाणपोई बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना सद्याच्या वाढत्या तापमानामुळे नाईलाजास्तव पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे. पाणपोईची दुरावस्था झालेली असून आजी - माजी नगरसेवकांचे याकडे आजिबात लक्ष नसून पालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील पाणपोईचे काहीही पडलेले नाही. याबाबत पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी हि बाब पुराव्यासहित निदर्शनास आणून दिली असून पाणपोई लवकरात लवकर दुरुस्त करून सुरु करावी अशी मागणी देखील त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. 
तसेच काही महिन्यांपूर्वी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी या ठिकाणी येऊन पाणपोई सुस्थितीत करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते व पुढील दोन-तीन दिवसातच पाणपोई सुरळीत सुरु होईल, जर पालिकेने केले नाही तर स्वखर्चाने आम्ही आमच्या जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून नागरिकांची समस्या निवारण करू असे प्रितम दादांनी सांगितले होते मात्र त्यांच्या या आश्वासनानंतर देखील पाणपोई बंद अवस्थेत आहे. पुढील २ -३ दिवसामध्ये जर का पाणपोई सुरु न झाल्यास पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे पाणपोई जवळ आंदोलन - उपोषण करण्यात येईल असा इशाराही केवल महाडिक यांनी प्रशासनाला दिला आहे. 


थोडे नवीन जरा जुने