स्वस्तिका घोषची पुन्हा चमकदार कामगिरी; आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पटकाविले रजत पदक
स्वस्तिका घोषची पुन्हा चमकदार कामगिरी; आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पटकाविले रजत पदक 


पनवेल(प्रतिनिधी) नार्कोटिक बोर्ड ऑफ रिपब्लिक ऑफ इंडोनेशियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२३ तसेच इंडोशियन क्लब लीग सेशन या दोन्ही स्पर्धेत पनवेलच्या स्वस्तिका घोष हिने महिला एकेरी खुल्या गटात रजत पटकावित भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते स्वस्तिकाचा सत्कार करण्यात आला. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत, हरिश्चंद्र पाटील, स्वस्तिकाचे वडील संदीप घोष उपस्थित होते


         नार्कोटिक बोर्ड ऑफ रिपब्लिक ऑफ इंडोनेशियाच्या वतीने बाली येथे इंटरनॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चीन, जपान, कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर या देशातील दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भारताकडून पनवेल येथील स्वस्तिका घोषने प्रतिनिधित्व केले. तीन या स्पर्धेत दमदार खेळी करत अंतिम फेरी गाठली मात्र तिला रजत पदकावर समाधान मानावे लागले. मात्र तीचा चमकदार खेळ पाहता तिला थेट इंडोशियन क्लब लीग सेशन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे हि स्पर्धा खेळणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. या मध्येही तीने आपल्या नेत्रदीपक कामगिरी आणि आक्रमक शैलीच्या जोरावर अंतिम फेरी गाठली, पण अंतिम सामन्यात ३-४, २-३ ने सेट स्कोअर गमावला. त्यामुळे या स्पर्धेतही तीने रजत पदक पटकावले.


        जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमध्ये स्वस्तिकाने इयत्ता तिसरी ते बारावी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर आता ती खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात (स्वायत्त) बीएमएसचे शिक्षण घेत आहे. स्वस्तिकाने देशात व परदेशात झालेल्या टेबलटेनिस स्पर्धेत चमकदारी कामगिरी करीत देशाचे नाव उंचाविले आहे. स्वस्तिकाने लहानपणापासून टेबलटेनिस खेळात आपली आवड व नैपुण्य दाखविले आहे. त्यामुळे तीला 'विराट कोहली फाऊंडेशन' कडून स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे. ती भारतातील एकमेव टेबल टेनिस खेळाडू आहे, जी या संस्थेद्वारे स्कॉलरशिपसाठी निवडली गेली आहे. टेबल टेनिससाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तिला वेळोवेळी आर्थिक मदत करण्याबरोबरच प्रशिक्षणासाठी खारघर येथील विद्यालयात विशेष सोय केली आहे. 
स्वास्तिकाचे वडील संदीप घोष हे या खेळातील प्रशिक्षक आणि सल्लागार आहेत. थोडे नवीन जरा जुने