पनवेल दि.१२ (संजय कदम) : ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी माझे अपहरण करण्यात आले आहे असा मेसेज मोबाईलद्वारे आपल्या नातेवाईकांना पाठवणाऱ्या एका तरुणास अखेरीस पनवेल शहर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांच्या सहकार्याने व तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला शोधून काढून सर्वांची फसवणूक केल्या प्रकरणी पुढील कारवाई केली आहे.
यतिश शंकर पुजारी (वय २३ रा. उसर्ली खुर्द) याच्या नातेवाईकांनी तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली होती. यतिश हा त्याच्या काकांकडे राहत होता त्याचे काका रिक्षा व्यवसाय करत होते. दरम्यान त्याच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर यतिशचे अपहरण झाल्याचा मेसेज आल्याने सर्वांची झोप उडाली.
अश्या कठीण प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाडिक व पोलीस नाईक परेश म्हात्रे यांनी तांत्रिक तपासद्वारे त्याचा शोध सुरु केला. दरम्यान यतिश हा पनवेल येथून रेल्वेने तामिळनाडू येथे गेला त्यांनतर कर्नाटक येथे गेला तेथून त्याने मँगलोर येथे असलेल्या नातेवाईकांना फोन करून माझ्याकडचे पैसे संपले आहेत तरी मी बस मधून प्रवास करत आहे.
कंडक्टरच्या गुगल पे ला पैसे पाठवायला सांगितले. त्यानंतर तो आपल्या नातेवाईकांच्या घरी पोचला. मात्र पनवेल येथून बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांना या पूर्वीच समजली होती त्यामुळे नातेवाईकांनी पनवेल येथे संपर्क साधून तो आमच्या कडे तो आल्याचे त्यांना सांगितले असे असले तरी ५० लाखाच्या खंडणीचा प्रश्न निर्माण झाला होता.
याबाबत पोलिसांनी व नातेवाईकांनी त्याला बोलते केल्यानंतर हा बनाव आपणच स्वतःच केल्याचे त्यांनी सांगितल्यावर सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला परंतु, आता त्याला कायद्याच्या चौकटीत सामोरे जावे लागणार आहे हे निश्चित.
Tags
पनवेल