कामोठ्यात थरारक 'हिट अँड रन': मद्यधुंद चालकाने महिलेला चिरडले, नागरिकांचा संताप अनावर, आरोपीला बेदम चोप.


नवी मुंबई: २३ जुन (4K News)कामोठे  येथे काळजाला थरकाप भरवणारी एक भीषण घटना रविवारी सायंकाळी कामोठे परिसरात घडली. एका मद्यधुंद आणि बेफाम चालकाने आपल्या स्विफ्ट कारने (एम एच 02 बीजी 6723) एका निष्पाप महिलेला जोरदार धडक दिली. इतकेच नाही, तर निर्दयीपणे तिला रस्त्यावर सोडून अनियंत्रित वेगाने पुढे जात रस्त्यावरील अनेक वाहनांना अक्षरशः चिरडले. या जीवघेण्या थरारानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी त्या क्रूर चालकाला अक्षरशः गाठले, त्याला बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. गंभीर जखमी झालेल्या त्या महिलेवर सध्या एमजीएम रुग्णालयात उपचार चालू आहे.

थरार असा घडला:
कामोठे सेक्टर ६ ए येथील हॉटेल सरोवरसमोर हा दुर्दैवी अपघात घडला. सायंकाळच्या वेळी रस्ता गजबजलेला असताना, मद्यधुंद अवस्थेतील चालकाने आपल्या गाडीचा ताबा गमावला. त्याने एका महिलेला इतक्या वेगात धडक दिली की ती रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. माणुसकीला काळीमा फासणारा हा चालक तिथे थांबला नाही. त्याने आपल्या वाहनाचा वेग आणखी वाढवला आणि हॉटेल सरोवरसमोरील पार्किंगमधील अनेक वाहनांना उडवले.

 धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरात एकच गोंधळ उडाला. अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.
ही भीषणता पाहून आजूबाजूच्या नागरिकांचा संताप अनावर झाला. त्यांनी या चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण दारुड्याने कोणालाही जुमानले नाही. त्याने आणखी बेफिकीरपणे वाहन चालवत रस्त्यावरील आणखी एका वाहनाला धडक दिली. यानंतर मात्र नागरिकांचा संयम सुटला. त्यांनी जीवावर उदार होऊन त्या बेफाम गाडीचा पाठलाग केला. अखेर, त्या नराधम चालकाला पकडून त्याला नागरिकांच्या संतापाचा सामना करावा लागला. जमावाने त्याला चांगलाच धडा शिकवला आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले.
या घटनेने कामोठे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. एका क्षणाच्या बेजबाबदारपणामुळे एका महिलेचा जीव टांगणीला लागला आहे. पोलिसांनी याप्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
थोडे नवीन जरा जुने