यंदाचा शेकापचा वर्धापन दिन कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारा - प्रितम म्हात्रेयंदाचा शेकापचा वर्धापन दिन कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारा - प्रितम म्हात्रे
खा.संभाजीराजे यांच्या उपस्थितीत २ ऑगस्ट रोजी सुधागड पाली येथे भव्य वर्धापन मेळावा
पनवेल दि २९ (वार्ताहर) : शेतकरी कामगार पक्षाचा येत्या २ ऑगस्ट रोजी साजरा होणारा वर्धापन दिन हा शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांसाठी नवीन स्फूर्ती घेऊन येणारा वर्धापन दिन असल्याचे मत शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केले.                 यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आपण पुढच्या वर्षाची वाटचाल करत असतो आणि दोन ऑगस्ट रोजी कितीही पाऊस असला, कितीही संकटे असली तरीसुद्धा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा वर्धापन दिन जिथे असेल तिथे कुठल्याही परिस्थितीत पोहोचतो. आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथून नवीन वाटचाल सुरू करतो. यावर्षीच्या वर्धापन दिनानमित्त खास बाब अनुभवण्यास मिळणार आहे. कारण छत्रपती संभाजीराजे हे शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनासाठी आपली हजेरी लावणार आहेत, तसेच ते शेकापच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे शेकापचे कार्यकर्ते देखील नव्या उत्साहाने कामाला लागतील असा विश्वास प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी प्रितम म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना सांगितले की, शेकापच्या सर्व कार्यकर्त्यांनी लाल झेंडा खांद्यावर घेऊन दोन ऑगस्टला छत्रपती संभाजीराजेंची मिरवणुक काढून सुधागड पाली येथे जायचं असल्यामुळे सगळ्यांनी शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो हा एकच नारा देत मिरवणुकीमध्ये सामील होऊन कामाला लागायचे आहे. या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आलेल्या आयोजनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, रायगड जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांच्यावर सध्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यांना पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची साथ राहणार आहे. 
तसेच शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धापन दिनाची तयारी सुरू आहे. दिनांक २ ऑगस्ट रोजी पनवेल आणि उरण येथील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे पनवेल येथील शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात सकाळी १०:३० वाजता जमणार आहेत. आणि येथूनच पालीच्या दिशेने जात असताना शेडुंग मार्गे खालापूर टोल नाक्यावर छत्रपती संभाजीराजे यांचे स्वागत करून जंगी मिरवणुक काढून सुधागड पाली येथील मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. छत्रपती संभाजीराजे यांचे आगमन म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित करणारा असणार असल्याचे मत देखील यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केले.


थोडे नवीन जरा जुने