पनवेल दि.20 (वार्ताहर) : महात्मा फुले कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पनवेल आणि बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच हरिग्राम येथे आर्थिक साक्षरता अभियानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष्य ग्रामपंचायत हरी ग्रामच्या सन्माननीय सरपंच निर्मला वाघमारे, महात्मा फुले महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नरेश मढवी, बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेच्या शाखा प्रबंधक, पुष्पा खत्री, विशेष सहाय्यक, अरविंद मोरे, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राध्यापक रियाज शेख, संतोष गोरवे, महाविद्यालयाचे विद्यार्थी व हरी ग्रामचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा. डॉ. नरेश मढवी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, जसे मानवाच्या आयुष्यात शिक्षणाला अनन्य साधारण महत्व आहे तसेच महत्व आर्थिक साक्षरतेला सुद्धा आहे. आर्थिक साक्षरतेमुळे आपल्या जीवनात भविष्यातील आर्थिक नियोजन चांगले करून आपले जीवन सुरक्षित होऊन आपल्या कुटुंबाला सुरक्षितता मिळते. ह्यामध्ये आपल्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण, विमा कवच, सुरक्षा राहण्यासाठी घर, पेन्शन व लग्न ह्या महत्वपूर्ण बाबींची पूर्तता करता येते व आपल्या कुटुंबाचे जीवन सुरक्षित करता येते. ह्यासाठी खास हरी ग्राम ह्या ग्रामीण भागात महाविद्यालयातर्फे आयोजन करण्यात आले होते. जर आपल्याला आर्थिक साक्षरतेबद्दल ज्ञान नसेल तर आपल्याला प्राप्त झालेल्या मोठ्या रकमेचे नियोजन करता येणार नाही.
आपली रक्कम तशीच खर्च होऊन जाईल. याप्रसंगी प्रमुख अतिथी बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेच्या शाखा प्रबंधक, पुष्पा खत्री म्हणाल्या की, प्रत्येक नागरिकाच बँकेमध्ये खातं असणं जरुरी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मुलांना बालपणापासूनच बचतीचे महत्व सांगून बचतीची सवय लावत आहे. बैंक जी मुलं शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करतात त्यांना शैक्षणिक कर्ज सुद्धा मंजूर करते असे सांगितले. तसेच महिलांना आर्थिक निर्भर व्हावे ह्यासाठी त्यांना बँक कर्ज सुद्धा देते असे सांगितले. पाप्रसंगी प्रमुख वक्ते बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेचे, विशेष सहायक, अरविंद मोरे यांनी बचतीचे महत्व, बँकेच्या विविध योजना जसे युवा योजना, पी.पी.एफ., विमा व सायबर गुन्ह्या पासून कशी सावधानता बाळगली पाहिजे ह्याबद्दल माहिती देऊन सर्वांनी बँक ऑफ महाराष्ट्र सोबत जुळण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास हरीग्रामचे ग्रामस्थ, महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा.रियाज शेख यांनी केले.
Tags
पनवेल