पनवेल दि.०७ (वार्ताहर) : परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा ८ वा वर्धापन दिन आवळीचा मळा (माणघर) येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. ह.भ.प. माधव बाबा इंगोले (आळंदी) यांचे सुश्राव्य किर्तन पार पडले. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण प. पू. स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांचे हस्ते व लोकनेते दि. बा. पाटील यांचे पुतळ्याचे अनावरण ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांचे हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजक दिलीप घरत यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व शाल देवून स्वागत केले. माधव पाटील यांनी आपल्या भाषणात अक्षयधाम मंदिरात होत असलेल्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात भक्ती व शक्ती यांचा संगम दिसत असला तरी लोकहितासाठी झटणा-या नेत्यांचा पुतळा याठिकाणी भविष्यात भावी पिढीला मार्गदर्शन ठरेल असे सांगितले. या कार्यक्रमास पनवेल तालुका कांग्रेस अध्यक्ष नंदराज मुंगाजी, बुधाजी ठाकूर, ज्ञानेश्वर कोळी यांच्यासह अनेक भाविक व दि.बा. पाटील यांचे चाहते उपस्थित होते.
Tags
पनवेल