ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ल्यावर लागली आग.






उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्याचे वैभव असलेल्या व ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे असलेल्या उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यावर गुरुवार 16/2/2023 रोजी दुपारी अंदाजे 5 च्या सुमारास किल्ल्यावर मध्यमागी जिथे दाट झाडे आहेत, वृक्ष वेली आहेत अशा ठिकाणी अचानक आग लागली. बघता बघता आगीने प्रचंड रूद्र रूप धारण केले होते. मात्र द्रोणागिरी पर्वतावर लागलेली आग विझविण्यात डाऊरनगर येथील लिंबाच्या वाडीवरील आदिवासी बांधवांना, व शिवराज युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना यश आले आहे.मात्र अधून मधून केव्हाही या किल्ल्यावर वणवा (आग )लागत असल्याने तसेच एवढ्या उंच व कठीण जागेत कोणतेही वाहन किंवा साधन सामुग्री नेता येत नसल्याने लागलेली आग विझविणे हे मोठे जोखमीचे काम झाले आहे.दुपारी 5 च्या सुमारास आग विझविलि गेली. मात्र परत रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास परत आग लागली. ती आग सुद्धा आटोक्यात आणली गेली.





आपल्या जीवाची पर्वा न करता ही आग विझविण्यासाठी मंगेश धर्मा कातकरी, रमेश रत्न कातकरी, अरुण हरी वाघे, संदिप रमेश कातकरी, सागर रमेश कातकरी, हनुमंत कृष्णा वाघमारे, प्रकाश किसन कातकरी, मंगेश रमेश कातकरी,भगवान दत्ताराम कातकरी, बाळकृष्ण भारत कातकरी,विजय रवी कातकरी, विश्वास कातकरी आणि मनिष गोविंद कातकरी यांनी तसेच शिवराज युवा प्रतिष्ठानचे द्रोणागिरी गड संवर्धन प्रमुख गणेश माळी यांच्या समवेत 10 ते 12 कार्यकर्ते यांनी शर्थीचे प्रयत्न करून आपला जीव धोक्यात टाकून आग विझविली. आग विझवली नसती तर सर्व झोपड्या जळून खाक झाल्या असत्या तसेच या पर्वताला लागूनच भारत सरकारचा ओ. एन. जी. सी. चा प्रकल्प आहे. या आगीमुळे या केमिकल युक्त ओएनजीसी प्रकल्पाला खूप मोठा धोका होता. 



सुदैवाने हा धोका टळला आहे.सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नाही.हि आग विझविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केलेल्या सर्व आदिवासी बांधवांचे,द्रोणागिरी किल्ल्याचे संवर्धन, संरक्षण करणाऱ्या शिवराज युवा प्रतिष्ठानच्या सर्व मावळ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.मात्र हि आग नेमकी कशी लागली, कशामुळे लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.अधून मधून केव्हाही आग, वणवा लागत असल्यामुळे उरणच्या द्रोणागिरी किल्ल्याचे अस्तित्व, वन संपदा, सजीव सृष्टी धोक्यात आली आहे.उरणमध्ये अनेक डोंगरे, किल्ले, वनसंपदा मोठ्या प्रमाणात असून या परिसरात वणवा, आगी लागण्याच्या अनेक प्रकार घडत आहेत.तर काही समाजकंटक आपल्या स्वार्थासाठी येथे आग लावत असल्याचे अनेकदा पाहावयास मिळाले आहे. त्यामुळे अशा आगी लागू नयेत यासाठी सर्वांनी एकत्र येउन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत उरण मधील विविध सामाजिक संस्था, संघटनेचे पदाधिकारी सदस्यांनी, शिवप्रेमींनी व्यक्त केले आहे.


थोडे नवीन जरा जुने