राष्ट्रभक्तीसाठी राजकारणात जाण्याची गरज नाही - शरद पोंक्षे

पनवेल दि. २१ (संजय कदम) : राष्ट्रभक्त होण्यासाठी राजकारणात जाण्याची गरज नाही. आपण छोट्या-छोट्या गोष्टींमधून सुद्धा राष्ट्रभक्ती करू शकतो असे मत ज्येष्ठ रंगकर्मी शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले आहे. ते पनवेल शहरातील डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित ‘सावरकर विचार दर्शन’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते.


 
पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे आयोजित व्याख्यानात संबोधताना शरद पोंक्षे यांनी सांगितले कि, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्य वीर सावरकर, लोकमान्य टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान नेत्यांनी आपल्यासाठी काय केले आहे याची माहिती आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे. त्यामुळे त्यांच्यात आपल्या देशाविषयी आत्मीयता जागी होईल व या मातीची ओढ त्यांच्यामध्ये टिकून राहील असे सांगितले. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन झाली. त्यानंतर मंदिर भिडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले’ या गाण्याने उपस्थितांची राष्ट्रीय चेतना जागवली.


 या कार्यक्रमाला रा.स्व.संघ जनकल्याण समिती कार्यवाह तुकाराम नाईक, संस्था अध्यक्ष डॉ. रवींद्र ईनामदार, कार्यवाह राजीव समेळ, कोषाध्यक्षा सौ.अनुराधा ओगले, सह कोषाध्यक्ष चेतन जोशी, रुग्णालय मुख्य संचालक व्यवस्थापक सुनील लघाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती सारंग, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक मनोज भुजबळ, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्यासह मान्यवर व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 दरम्यान कार्यक्रम सुरुवातीच्या अगोदर शरद पोंक्षे यांनी रा.स्व.संघ जनकल्याण समिती संचालित डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाची पाहणी करत रुग्णालयाच्या माध्यमातून होत असलेल्या कामाची प्रशंसा केली. यावेळी रुग्णालयात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिबीन भास्करन, सौ.संचीता साखरे, सौ.वनीता बाचकर, सौ.गायत्री कदम यांचा शरद पोंक्षे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

थोडे नवीन जरा जुने