चारित्र्याच्या संशयावरून भर रस्त्यात पत्नीवर चाकूने हल्ला
पनवेल दि.१९ (वार्ताहर) : पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत फिरत असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीने भर रस्त्यात आपल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना खारघर सेक्टर -१३ मध्ये उघडकीस आली आहे. दादाराव सहदेव इंगळे असे या व्यक्तीचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पतीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


या घटनेतील आरोपी पती दादाराव इंगळे व गंभीर जखमी असलेली त्याची पत्नी दोघेही खारघर सेक्टर-१३ मध्ये चार मुलांसह राहण्यास आहेत. दादाराव हा पत्नीवर नेहमी संशय घेत असल्याने या दोघांमध्ये सतत भांडण होत होते. घटनेच्या दिवशी या पती-पत्नीमध्ये नेहमीप्रमाणे भांडण झाले. त्यामुळे हे दोघे भांडण करत रस्त्यावर आले. यावेळी त्यांची मुले देखील त्यांच्या सोबत होती. या दोघांमध्ये सेक्टर- १३ मधील शहीद मुकेश पेट्रोल पंपाजवळ जोरजोरात भांडण सुरू होते, याचवेळी दादाराव इंगळे याने रागाच्या भरात पत्नीच्या गळ्यावर वार करून त्या ठिकाणावरून पलायन केले. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पत्नीला नागरिकांनी कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी दादाराव इंगळे याचा शोध घेऊन त्याला अटक केली. दादाराव याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांनी दिली.


थोडे नवीन जरा जुने