रायगडात शेकापला ‘जोर का धक्का’, माजी आमदार धैर्यशील पाटील भाजपात





पनवेल(प्रतिनिधी) पेण मतदारसंघाचे माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते धैर्यशील पाटील यांनी आज (मंगळवार, दि. २८ फेब्रुवारी) भाजपमध्ये प्रवेश करत रायगडात शेकापला 'जोर का धक्का' दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत धैर्यशील पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. 



    मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, सरचिटणीस विक्रांत पाटील, विस्तारक अविनाश कोळी, जिल्हा संघटक सरचिटणीस सतीश धारप, मिलिंद पाटील, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मपारा, गीता पालरेचा, युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग, पेणच्या माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, गटनेते अनिरूद्ध पाटील, रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, यांच्यासह पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


      यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, त्यांच्या सुविद्य पत्नी व रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष नीलिमा पाटील, माजी जि. प. सदस्य महादेव दिवेकर, डी. बी. पाटील, प्रभाकर म्हात्रे, पं.स.च्या माजी सभापती मनीषा भोईर, माजी उपसभापती रूचिता पाटील, माजी सदस्य सुनील गायकर, सरिता म्हात्रे, निळकंठ दिवेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ, खरेदी विक्री संघाचे प्रमुख बापू दळवी, माजी नगरसेवक शोमेर पेणकर, माजी नगरसेविका सुनिता जोशी, संतोष पाटील, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे मान्यवरांनी स्वागत केले.
           रायगड जिल्हयातील पालीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता पालरेचा आणि अलिबागमधील शेकापचे दिलीप भोईर यांनी यापूर्वी भाजपात प्रवेश केला होता. आता पेणमधून धैर्यशील पाटील यांनी प्रवेश करत शेकापला जोरदार धक्का दिला आहे. महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के मिळत असताना माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी लाल बावट्याची साथ सोडत भाजपात प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले होते. त्यांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा दारूण पराभव केला होता. या पराभवाच्या धक्क्यातून शेकाप आता कुठे सावरत होता. परंतु त्यापूर्वी भाजपने आणखी धक्का दिला आहे. त्यामुळे एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या शेकापचा खिंडार झाला आहे. 
     यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले कि, “मला अतिशय आनंद आहे की आज धैर्यशील पाटील यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. २०१४ साली मी प्रयत्न केला होता. पण मला यश मिळालं नाही. त्यांनी सामान्य माणसाकरता काम केलं आहे. विरोधी पक्षात असताना ते आपले प्रश्न धडाडीने मांडायचे. मी मुख्यमंत्री असताना सुद्धा ते माझ्याकडे प्रश्न घेऊन यायचे आणि मी ते सोडवायचो. अशा कार्यकर्ताचं नेतृत्व आपल्याकडे असलं पाहिजे, असे मला वाटत होते”, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं. 


      यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी बोलताना म्हंटले कि, “भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ताकदीने आपण शेकापमध्ये काम केलं त्याच पद्धतीने आपण इथेही काम करू. कष्टकरींचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यासाठी आणखी धार यावी, आणि राष्ट्रीय पातळीवर कष्टकऱ्यांचं म्हणणे मांडता यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत आहोत”, असे धैर्यशील पाटील म्हणाले.



 
थोडे नवीन जरा जुने