पनवेल दि.१९ (संजय कदम) : पनवेल तालुक्यात एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी गाडीतील डिझेल चोरी करणाऱ्या टोळीतील एकाला पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध पोलीस करीत आहेत. दरम्यान पोलिसांनी पनवेल तालुक्यात डिझेलमाफियांविरुद्ध कारवाई सुरु केल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा रसायनी, चौक, दांड फाटा व खालापूर महामार्गावर असलेल्या हद्दीतील ढाब्यांवर सुरु केला आहे.
पनवेल तालुक्यातील निवृत्ती ईश्वर करांडे हे जे.डब्ल्यु.आर कंपनी जवळ, जेएनपीटी रोडवर त्यांच्या ताब्यातील टाटा कंपनीचा ट्रेलर (एनएल ०१ एबी ७२८७) रस्त्याच्या कडेला बंद व उभी करुन गाडीतच झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने गाडीचे डिझेल टॅकचे लॉक तोडून त्यामधील ६,५८० रुपये किमतीचे ७० लिटर डिझेल चोरून नेले. तर दुसऱ्या घटनेत रुपेश परशुराम भोईर ह्यांनी गाढी नदीच्या पुलावर, टी पॉईंट ते कळंबोली जाणा-या रोडवर १४ चाकी ट्रेलर (एमएच ४६ एएफ 5320) पार्क करुन ठेवला असता अज्ञात इसमाने ट्रेलरमधून ५ हजार रुपये किंमतीचे ५५ लिटर डिझेल चोरी केले. तसेच तिसऱ्या घटनेत बाकीराव कट्टरवडे यांनी त्यांच्या ताब्यातील अशोक लेयलैंड कंपनीचा ट्रक (एमएच २३ डब्ल्यु ५०४६) रस्त्याच्या कडेला उभी करुन गाडीतच झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने गाडीचे डिझेल टॅकचे लॉक तोडून त्यामधील ७,७२० रुपये किमतीचे ८० लिटर चोरून नेले. त्याचप्रमाणे पळस्पे परिसरात सुद्धा एका उभ्या वाहनातून डिझेल चोरीची घटना घडली होती.
याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिसांकडे दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क पोलीस निरीक्षक गणेश दळवी, पोलीस हवालदार अविनाश गंथडे, पोलीस नाईक अमोल पाटील, अशोक राठोड, महेश पाटील, मिथुन भोसले, पोलीस शिपाई विशाल दुधे आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने सापळा रचून अंशू राजेशकुमार चव्हाण (३३, रा.कोपरखैरणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केले असता त्याने त्याच्या साथीदारांसह हि डिझेल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून २१० लिटर डिझेल जप्त केले असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.
Tags
पनवेल