डाॕ.संजीव म्हात्रे.
इमर्जन्सिजना हात लावायला, अॕटॕकच्या रूग्णाला लाइफ सेविंग्ज इंजेक्शन द्यायला डाॕक्टरांच्या हाताला कापरं भरायला लागलय, काय कारण असावं?
मनात कसलाही वाईट हेतू नसताना, आलेला रूग्ण हा कोणी मित्र वा दुश्मन नसतानाही त्याला अॕडमिट करून घ्यायला डाॕक्टरांची हिंमत होत नाही, काय कारण असावं?
कुठलाही उपचार सुरू करण्यापूर्वी वा औषध देण्यापूर्वी, त्या औषधांची जर रिअॕक्शन आली तर दोष डाॕक्टरचा असेल तर औषध लिहून द्यायला पेन वळत नाही, काय कारण असावं?
हजारो बरे होतात आणि एखाद्याचा मृत्यू होतो तेंव्हा मात्र डाॕक्टरला दोषी ठरवलं जातं, दोषी ठरून स्वतःचाच जीव धोक्यात घालायला डाॕक्टरचं मन आता धजावत नाही, काय कारण असावं?
डाॕक्टर होऊन खेड्यापाड्यात कवडीमोलाने व्यवसाय करताना, IT सेक्टरमधल्या इंजीनिअर्सचे गडगंज पगारांचे पोवाडे ऐकताना ५०-१०० रूपये गोळा करायला खेड्यातील डाॕक्टर स्वतःलाच दोष देतो, काय कारण असावं?
आपल्या सरकारला सुसज्ज हाॕस्पिटल्स बनवायला व डाॕक्टरांना पगार द्यायला पैसे नाहीत पण हजारो करोडोंची माती करायला लाखो करोडचं बजेट आहे, आणि मग स्वबळावर विस्थापित केलेल्या (कार्पोरेट हाॕस्पिटल सोडून, कारण ती डाॕक्टरांची नाहीत, धनीकांची आहेत) हाॕस्पिटल्सकडून अमाप अपेक्षा ठेवणाऱ्या जनतेच्या बुद्धिची किव करताना, आलेल्या परिस्थितीशी झगडताना 24×7 टेंशनमधेच असतो, काय कारण असावं?
मुलाला वा मुलीला MBBS करताना सरकारने आकारलेली दरवर्षाची २५ लाख फी भरता भरता ५ वर्षात बापाचे दीड करोड संपलेले असतात, पुढे MS/MD साठी आणखी दीड करोड. कधी विचार केलाय की हा नव्याने तयार झालेला डाॕक्टर पित्याला याची कशी परतफेड करणार? आणि कधी सरकारला जाब विचारलाय की अशा अतिमहत्वाच्या शिक्षणाला अशी डोंगराएवढी फी का आकारली जाते? प्रायव्हेट काॕलेजेस पेक्षा स्वस्त शिक्षण देणारी शासकीय काॕलेजेस का उभारली जात नाहीत? नाही, ते करण्यापेक्षा आपण टीका करण्यात धन्यता मानतो. वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय व्यवसायाची सांगड घालणे अवघड झाले आहे. काय कारण असावं?
सरकारी दवाखाने सुधारण्यात, तीथे शासकीय वैद्यकीय अधिकारी, सुपर स्पेशियालिस्ट हवेत म्हणून आवाज उठवला नाही, सर्व सुविधेनेयुक्त सरकारचं हाॕस्पिटल व्हावं म्हणून सरकारवर दबाव आणला नाही, सरकारी अधिकारी, नगरपालीका, पंचायत समीती, ZP, आमदार, खासदार हे आपल्या तालुक्यातील फक्त दोन सरकारी हाॕस्पिटल्समधे अत्याधुनिक सुविधा का आणू शकत नाही? कधी विचालाय प्रश्न? प्रचंड मोठ-मोठ्या प्रकल्पातील आपल्या विश्वस्थांना सुसज्ज हाॕस्पिटल उपलब्ध करून देणं अवघड आहे का? पण आम्हाला जीथे आवाज उठवायचा तीथे न उठवता निरुपद्रवी डाॕक्टर प्राण्यावर आवाज उठवणे सोपे वाटते. काय कारण असावं?
माॕल, सिनेमे, हाॕटेल्स, पब, परदेश वाऱ्या, पार्लर्स, ब्रँडेड कपडे इत्यादी, CA, वकील, प्राॕपर्टीज इ. गोष्टींवर लाखो खर्च करणारे जेंव्हा हाॕस्पिटलच्या खर्चाविषयी चर्चा करतात तेंव्हा निर्जीव वस्तूंच्या तुलनेत जीवनाची किंम्मत एवढी कमी आहे का? याची जाणीव डाॕक्टरला होते आणि केलेलं सर्व फुकट म्हणून स्वतःचीच समजूत काढतो, काय कारण असावं?
हाॕस्पिटलमधे ही सुविधा पाहिजे, ती सुविधा पाहिजे असे म्हणणारे बिल भरताना नाकं मुरडतात तेच 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार हाॕटेलचं मजबूत बील भरून वर वेटरला टीप देतात. मग पुन्हा त्या हाॕटेलमधे जाण्यासाठी वाचवलेल्या जीवाची किंम्मत भरताना पडलेल्या आठ्या आणि लाठ्या डाॕक्टरांच्या पश्चातापाचं कारण बनतात, काय कारण असावं?
पार्ट्या झोडताना, महागड्या ब्रँडच्या दारूच्या बाटल्या फोडताना, महागड्या डिशेस फस्त करताना कितीही बील होवो, भरायला तयार असणारे आम्ही डाॕक्टरांची फी म्हणजे जनतेची लूट म्हणून बोंबा मारतो तेंव्हा डाॕक्टरांना त्यांच्या सेवेचं दुःख वाटू लागतं, काय कारण असावं?
सरकारी कर्मचाऱ्यांना काम कमी आणि सुट्ट्याच जास्त, प्रायव्हेट वर्कर्सना पाच दिवसांचा आठवडा, प्राध्यापक अध्यापकांना 3-4 तासच काम तरीही पगार फुल्ल. आणि डाॕक्टरांनी सुट्टी घेतली तीही बिनपगारी तर मात्र बोंबाबोंब. दर आठवड्याला दोन दिवस भरपगारी सुट्टीची मजा घेणाऱ्या आणि रविवारीही दवाखान्यात यायलाच पाहिजे असा सल्ला देणाऱ्या लोकांकडून माणूसकीची अपेक्षा डाॕक्टरांनी सोडलीय, काय कारण असावं?
आपल्याकडे RMO म्हणून MBBS डाॕक्टर्सची वानवा आहे. रात्री-अपरात्री स्पेशियालिस्ट्स उपलब्ध होणे कठीण आहे. रूग्ण अत्यावस्थ असेल तर थोडीफार उपलब्ध सुविधा तोकडी पडते. CT स्कॕन नाही, ब्लड बँक नाही, व्हेंटीलेटर नाही आणि रूग्ण पुढे न्यावा तर १-२ तास लागणार असतात. मग अशा परिस्थितीत आपला रूग्ण सुरक्षित पुढील ट्रीटमेंटसाठी जावा असं वाटत असेल तर उपलब्ध असलेल्या ट्रीटमेंटवर विश्वास ठेवणे आहे व त्या प्राथमिक उपचारानंतर त्या रूग्णाला पुढे घेऊन जाणे आहे. परंतू जर प्रा.उपचारानंतर जाताजाता दुर्दैवाने त्या रूग्णाची प्राणज्योत मावळली तर मात्र त्याचा सर्व दोष हा समाज प्राथमिक उपचार देणाऱ्या डाॕक्टरवर टाकतो. ही विकृती समाजात असल्याने डाॕक्टर सध्या हतबल झाले आहेत. डाॕक्टर म्हणजे माणसांना जीवंत करण्याची मशीन नाही. तोही एक माणूसच आहे. आम्ही दारू पिऊन अॕक्सिडेंट करायची पण त्याला डाॕक्टरांनी मात्र बरा केलाच पाहिजे, आम्ही तंबाखू सिगारेट्स ओढायच्या पण अॕटॕक आल्यावर तो वाचलाच पाहिजे, रूग्णालयात आलेला रूग्ण बराच झाला पाहिजे. कसली ही मानसिकता? गरज सरो वैद्य मरो ही सुद्धा पुर्वांपार चालत आलेली म्हण आहे. काय कारण असावं?
वैद्यकीय व्यवसाय ही सेवा आहे असं म्हटलं तर सरकार तर या सेवेसाठी काहीच देत नाही, उलटपक्षी अनेकानेक बंधनांनी डाॕक्टरांच्या हाताला बेढ्या ठोकतोय. तरीही डाॕक्टर झाल्यापासून तो समाजाची सेवा सुरू करतो. गरीबांना सवलत ही तर आयुष्यभर सुरू असणारी सेवा करत असतो? तुम्ही नोकरदार काय करता? रात्री अपरात्री पेशंट्स बघतो त्यावेळी तुम्ही छान घोरत असता. गावांमधे तर घरपोच सेवा करूनही हातावर काय टेकता? ब्राम्हणाला तरी ज्यास्त दक्षिणा देता. फ्री मेडिकल व हेल्थ चेकअपच्या नावाखाली सर्व राजकीय व सामाजीक पुढारी काय करतात? त्यावेळी सेवा डाॕक्टरच देतो. श्रेय मात्र पुढाऱ्यांना. पैशांवाचून आॕपरेशन्स अडलेल्यांना डाॕक्टरकरवीच कमी खर्चात आॕपरेशन्स करून घेता, तीही सेवा डाॕक्टरच देतो. तरीही समाजाचे टोमणे ऐकताना समाजाचाच राग येतो. काय कारण असावं?
समाज जर असाच वागत राहिला तर आधीच कमतरता असलेल्या आपल्या देशातून चांगले डाॕक्टर्स परदेशी जाण्याचाही विचार करतील. बाहेरील देशांमधे अजूनही डाॕक्टर - पेशंटचं नातं आदरानं जपलं जातं. पूर्वी सुविधा नसतानाही केवळ माझ्या रूग्णासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा डाॕक्टर आत्ता ग्राहक संरक्षण कायद्याखाली घुसमटतोय, काय कारण असावं?
संपुष्टात येत चाललेलं डाॕक्टर -पेशंट चं नात पुन्हा कसं दृढ होईल यासाठी चांगली विचारसरणी व चांगल्या समाजाची गरज आहे.विश्वास ठेऊन तर बघा....पण विश्वासघात करू नका....
डाॕ.संजीव म्हात्रे.
उरण.
9870561510
Tags
उरण