पारगावच्या विकास कामासंदर्भात सरपंच आणि शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट








पारगावच्या विकास कामासंदर्भात सरपंच आणि शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पनवेल- पारगावच्या विकास कामासंदर्भात ग्रुप ग्रामपंचायत पारगावच्या सरपंच अहिल्या नाईक आणि शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. 



पनवेलजवळील असलेल्या पारगाव गावाची विकास कामे व सिडकोच्या कामासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना सदर या कामासंदर्भात कारवाईचे आदेश दिले आहेत.
 याप्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, ग्रुप ग्रामपंचायत पारगावच्या सरपंच अहिल्या नाईक समाजसेवक बाळाराम नाईक, उपसरपंच सुनंदा नाईक, माजी उपसरपंच व सदस्य मनोज दळवी, माजी उपसरपंच व सदस्य अंजली कांबळे उपस्थित होत्या.



त्यांनी दिलेल्या निवेदनात, ग्रुप ग्रामपंचायत पारगाव येथील सर्व शेतजमिनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित झाल्या असून जमिनीचा संपूर्ण ताबा सिडकोकडे देण्यात आला आहे परंतु पारगाव व डुंगी गावचे पुनर्वसन झालेले नाही सदर भूसंपादन प्रक्रिया होत असताना सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक यांनी पारगाव गावाला अल्ट्रा मॉडर्न गाव बनवून देण्याचे देणार असल्याचे आश्वासन दिले होते, त्यामध्ये गावात सामाजिक सुविधांसाठी भूखंड आरक्षित करून त्यांचा विकास करणे, गटारे , मल:निसारण तसेच भूमिगत विद्युत वाहिन्या, पाण्याच्या लाईन्स तसेच



 विमानतळाच्या भरावामुळे पूरस्थिती होऊ नये याबाबतची तातडीने कामे करून देण्याचे आश्वासन दिले होते मात्र भूसंपादनासाठी २०१५ साली संमती दिल्यानंतर ग्रामपंचायतींना विकास कामासाठी देण्यात येणारा निधी बंद केला.२०१५ ते २०२२ पर्यंत कोणताही विकास कामे सिडकोने केलेली नाहीत.



हे सर्व पाहता सिडकोमार्फत विकास कामांना होणारा निधी मंजूर करावा, पुष्पक नोडमधील अंतर्गत भूखंड २३५ वरील शाळेचे आरक्षण रद्द करून सदर भूखंड गावाकरता क्रीडांगण म्हणून राखून ठेवावा, पावसाळ्यापूर्वी सर्व विकासकामे मार्गी लावावीत त्याचबरोबर सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांबरोबर बैठक आयोजित करून,या विकास कामासंदर्भात न्याय द्यावा अशी विनंती ग्रामपंचायतीच्यावतीने मुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने