उरण दि 31( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील मौजे सावरखार ग्रामस्थांच्या जमिनी न्हावा शेवा प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या होत्या. त्यांना जमीन संपादन वेळी नोकरी देण्याचे वचन प्रशासनाकडून देण्यात आले होते.
परंतु आजतागायत मौजे सावरखार ग्रामस्थांना नोकरीत प्राधान्य देण्यात आलेले नाही. त्यांना नोकरी उद्योग धंदयापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. या अन्यायाच्या विरोधात ग्राम सुधारणा मंडळ सावरखारने आवाज उठविला असून दिनांक 20/4/2023 रोजी रायगड जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्त नवी मुंबई, कामगार आयुक्त पनवेल,जेएनपीए प्रशासन,तहसील कार्यालय उरण,उरण पोलीस ठाणे, मुख्य सतर्कता अधिकारी जेएनपीए आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून 15 दिवसाच्या आत जे एन पी ए प्रशासनाने व सेझ प्रशासनाने सावरखार ग्रामस्थांना नोकऱ्या दिल्या नाहित तर गेट बंद करून काम बंद करण्याचा इशारा जेएनपीए प्रशासनला ग्राम सुधारणा मंडळ सावरखार ने दिला होता.
तरीही मात्र सेझ प्रशासन व जेएनपीए प्रशासनाने सावरखार ग्रामस्थांच्या महत्वाच्या मागणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसाच्या आत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ग्रामसुधारणा मंडळ सावरखारच्या वतीने सेझच्या गेट समोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. उपोषण दरम्यान जर कोणाचे बरे वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी जेएनपीए व सेझ प्रशासन जबाबदार असेल असा कडक इशारा ग्रामसुधारणा मंडळ सावरखारने दिला आहे.
मौजे सावरखार ग्रामस्थांच्या 76 टक्के जमिनी शासनाने भुसंपादन करून सिडको व जे.एन.पी.टी. यांच्याकडे वर्ग केलेल्या आहेत. जमिनी घेतल्या परंतु ग्रामस्थांना नोक-यांपासून वंचित ठेवण्यात येवून आमच्यावर अन्याय केला आहे. सदर अन्याय दुर करण्याच्या दृष्टीने आम्ही ग्राम सुधारणा मंडळ, सावरखार तर्फे प्रशासनाकडे न्याय मागत आहोत.
जेणे करून प्रशासना मार्फत जेएनपीए व सेझमध्ये आमच्या गावच्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून न्याय मिळेल एवढीच माफक अपेक्षा आहे.मात्र ग्रामस्थांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. जाणून बुजून ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे लवकरच आमरण उपोषण करणार असल्याची माहिती ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष अनिल घरत यांनी दिली आहे.
प्रशासनाच्या अधिपत्याखालील जे.एन.पी.ए. व सेझमध्ये सावरखार ग्रामस्थांना नोक-या मिळाल्या नाहीत तर जेएनपीए प्रशासनाकडुन सुरु असलेल्या ठेकेदारांची कामे ग्रामसुधारणा मंडळ सावरखार यांचेमार्फत बंद पाडून 'काम बंद' करून आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष अनिल घरत,उपाध्यक्ष गणेश घरत,सेक्रेटरी परेश ठाकूर,खजिनदार नितीन घरत,ऑडिटर हर्षद ठाकूर यांनी जेएनपीए व सेझ प्रशासनाला दिला आहे.
Tags
उरण