पनवेल(प्रतिनिधी) तळोजा फेस १ येथील पाण्याची टाकी शुक्रवार पासून कार्यान्वीत झाल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. तब्बल पाच वर्षांपेक्षा जास्त काळ अपुरा पाणीपुरठा तसेच कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याने हैराण झालेल्या तळोजा फेज १ मधील रहिवाशांची प्रतीक्षा यामुळे संपली असून नव्या पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होणार असल्याने येथील रहिवाशांना आता मुबलक पाणी मिळणार आहे. यावेळी माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी उपस्थित होते.
शहरात कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अनेक सोसायट्यांपर्यंत हे पाणी पोहोचत नव्हते. त्यासंदर्भात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपनेते प्रल्हाद केणी, तसेच माजी नगरसेवक हरेश केणी यांनी पाठपुरावा करुन सिडकोच्या पाणीपुरवठा विभागात बैठका घेतल्या.
भाजपनेत्यांच्या या सातत्यापूर्ण पाठपुराव्याला यश आले असून सेक्टर ८ येथील पाण्याची टाकी कार्यान्वित झाली आहे. तळोजा फेज १ मध्ये एमआयडीसीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. शहराला ५ एमएलडी पाण्याची गरज आहे.
थेट सिडको या ठिकाणी पाणीपुरवठा करत नाही. नव्याने कार्यान्वित झालेल्या टाकीमुळे पाण्याची साठवण क्षमता वाढणार असल्याने शहरात जादा दाबाने पाणीपुरवठा होणार आहेत. होणार असल्याची माहिती सिडकोचे पाणीपुरवठा अधिकारी चेतन देवरे यांनी दिली.
तळोजा फेज १, २ या ठिकाणची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सिडकोला त्यादृष्टीने नियोजन करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने याबाबत पाठपुरावा करत असल्याची प्रतिक्रिया हरेश केणी यांनी यावेळी दिली.
Tags
पनवेल