पनवेल(हरेश साठे) राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचे असते हि समाजहिताची शिकवण स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी दिली, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. ०७ मे ) उलवा नोड येथे केले.
कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३५ व्या पुण्यतिथी निमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव तसेच पनवेल तालुकास्तरीय "स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२३" पारितोषिक वितरण समारंभ उलवे नोड मधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे समारंभपूर्वक पार पडला. तत्पूर्वी शेलघर येथे भगत साहेब निवासस्थानी भगत साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. त्यावेळी समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून शकुंतला रामशेठ ठाकूर, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उप कार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, प्रा. डी. एन. माने सर, माजी सरपंच पांडुमामा घरत, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, खजिनदार भाऊशेठ पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, सदस्य अनिल भगत, प्रकाश भगत, संजय पाटील, संजय भगत, अजय भगत, वसंत पाटील, हरिश्चंद्र पाटील, संजय गोंधळी, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, अमोघ ठाकूर, यांच्यासह, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, तेजस कांडपिळे, विकास घरत, प्रदीप घरत, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, कल्पना ठाकूर, वृषाली वाघमारे, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश्वर म्हात्रे, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, गव्हाण
ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायत उपसरपंच अमर म्हात्रे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, दा. चा. कडू गुरुजी, विश्वनाथ कोळी, शरद खारकर, अनंत ठाकूर, जयवंत देशमुख, अनिल देशमुख, हेमंत ठाकूर, रतन भगत, अमृत भगत, सी. एल. ठाकूर, अरुण ठाकूर, श्रीकांत घरत, रवींद्र भगत, किशोर पाटील, व्ही. एन. भोईर, सुरेश पाटील, चंद्रकांत घरत, शिवाजी दुर्गे यांच्यासह भगत साहेबांचे कुटुंबीय, नातेवाईक, हजारो पंचक्रोशीतील नागरिक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे म्हंटले कि, भगत साहेबांनी केलेल्या कार्यामुळे हा परिसर नावाजला. शिक्षण, न्याय देण्याचे काम त्यांनी केले. अहोरात्र समाजाची सेवा हाच त्यांचा उद्देश कायम राहिला. ८४ गावांचा न्याय निवाडा करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची त्यांनी सामाजिक भूमिकेतून काळजी घेतली. स्व. जनार्दन भगत साहेबांनी अहोरात्र आपला देह 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' या तत्त्वाच्या पूर्ततेसाठी कारणी लावला.
तळागाळातल्या लोकांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते. दारिद्रय व भूक यांच्याबद्दल अगदी मनापासून तळमळ होती. तळागाळातील समाजाचा उद्धार फक्त शिक्षणामूळेच होऊ शकेल हे त्यांनी जाणले होते. आपली दूरदृष्टी, अविश्रांत श्रम, चिकाटी, धडाडी त्याचबरोबर व्यापक समाजहिताची तळमळ ही उदात्त भावना स्व. जनार्दन भगत यांच्या अंत:करणात कायम होती. त्यांची शिक्षणाविषयी असणारी प्रचंड आस्था, तळमळ या इच्छापूर्तीच्या उद्देशाने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यामुळे त्यांचे काम पुढे सुरूच ठेवणे हि त्यांना श्रद्धांजली आहे, असे सांगतानाच भगतसाहेबांचे शिष्य म्हणून काम करीत राहू या, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आवाहनही केले.
भगत साहेबांची जयंती २९ फेब्रुवारीला असल्याने लीप वर्षाच्या अनुषंगाने दर चार वर्षांनी येते. त्यावेळी महाराष्ट्र स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणीजनांचा ०५ लाख रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्याचे ठरवले त्यानुसार पहिला मान थोर विचारवंत स्व. एन. डी. पाटील यांना दिला गेला. त्याचप्रमाणे पुढेही दर जयंतीला गौरव करण्यात येणार असून २०२८ साली भगत साहेबांचा जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यावेळी महाराष्ट्र स्तरावरील आणि फेब्रुवारी संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रमे घेणार असल्याचेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती तसेच विविध क्षेत्रातील गुणिजनांचे कौतुक करून अभिनंदन केले.
Tags
पनवेल