भरधाव इनोव्हा गाडीची ब्रीझा गाडीस धडक; एक ठार चार जखमी

भरधाव इनोव्हा गाडीची ब्रीझा गाडीस धडक; एक ठार चार जखमी  
पनवेल दि. १८ (वार्ताहर) : पनवेल जवळील गव्हाण फाटा येथे उरणकडून पनवेलच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या इनोव्हा चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याची कार दुसऱ्या ब्रीझा कारला जाऊन धडकली. या भीषण अपघातात एक जण ठार झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना बेलापूर येथील अपोलो तसेच कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.   

                     
                          इन्होवा गाडी क्रमांक एम एच ४३ ए डब्लू २४३० वरील चालक याने त्याच्या ताब्यातील वाहन घेऊन उरण येथून पनवेलच्या दिशेने भरधाव जात होता. त्याची गाडी गव्हाण फाटा येथे आली असताना इनोव्हा कारचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्तादुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर जाऊन पनवेल येथून उरणच्या दिशेने जाणाऱ्या ब्रीझा गाडी क्रमांक एम एच ४३ सी. सी. ८३७३ या कार वर धडकली. या अपघातात ब्रीझा कारमधील नारायण थोटे वय ( ७१ ) राहणार कोपरखैरणे हे गंभीररित्या जखमी होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे . तर इतर चार जण जखमी झाले आहेत .


 या अपघातानंतर इन्होवा चालक गाडी सोडून पसार झाला आहे . या अपघाताची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे , पोलीस उपनिरीक्षक गोविंद दाभाडे , पोहवा हनुमंत आहिरे व पोलिसांचे पथक घटना स्थळी त्वरित रवाना झाले व अपघातग्रस्त वाहनांना एका बाजूस केले . या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 
थोडे नवीन जरा जुने