स्मशानभूमी साठी म्हात्रोळी ग्रामस्थ आक्रमक






स्मशानभूमी साठी म्हात्रोळी ग्रामस्थ आक्रमक
पनवेल दि.१७(वार्ताहर): अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावचा स्मशानभूमीचा प्रश्न मागील काही वर्षापासून भिजत घोंगड होऊन पडला आहे. हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्मशानभूमीसाठी समाजक्रांती आघाडी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ मंडळ म्हात्रोळीच्या काही ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.


     म्हात्रोळी गावासाठी सारळ ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. १७७, जुना गट नं. २६०, क्षेत्र ०.०७.०० हे.आर. स्मशानभूमीसाठी राखीव आहे. परंतु या राखीव जागेत स्मशान चौथरा बांधण्यासाठी शासनाकडून लेखी परवानगी व पोलीस संरक्षण मिळत नाही. त्यामुळे नाईलाजाने आपल्याला आमरण उपोषण करावे लागणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. म्हात्रोळी हे गाव डोंगराच्या कुशीत वसले आहे. गावात एखाद्याचे निधन झाले तर त्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ३ कि.मी. अंतरावरील सारळ स्मशानभूमीत चालत जावे लागते.



 मागील अनेक वर्षापासून म्हात्रोळी ग्रामस्थ सारळ पुलावर अंत्यसंस्कार करीत आले आहेत. दिवसेंदिवस एवढे लाबं अंतर चालत जाणे आता शक्य होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. प्रत्येक गावात स्मशानभूमी असणे हे आवश्यक आहे. त्यामुळे म्हात्रोळी ग्रामस्थांची मागणी अवास्तव नाही, असे सांगून स्मशानभूमीचा चौथरा बांधण्यासाठी सारळ ग्रामपंचायतीने यापूर्वी ठराव मंजूर केला आहे. सातबाऱ्यावरही चौथऱ्यासाठी राखीव अशी नोंद आहे. 


एवढेच नव्हे तर स्मशानभूमीचा चौथरा बांधण्याचा खर्च ग्रामस्थ करण्यास तयार आहेत. परंतु स्मशानभूमीचा चौथरा बांधताना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाची लेखी परवानगी अपेक्षित आहे. त्याबरोबरच पोलीस संरक्षणही आवश्यक आहे. मात्र अद्याप शासनाने आपल्या मागणीची कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव उपोषण आंदोलन करावे लागत आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.आपल्या मागणीची गांभीर्याने दखल न घेतल्यास समाजक्रांती आघाडी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली १९ जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांना दिले आहे.



थोडे नवीन जरा जुने