पनवेल तालुक्यात विजेचा खेळखंडोबा; पनवेल काँग्रेसची महावितरण कार्यालयाला धडक


पनवेल तालुक्यात विजेचा खेळखंडोबा; पनवेल काँग्रेसची महावितरण कार्यालयाला धडक
अखंडित वीजपुरवठा न दिल्यास रस्त्यावर उतरून टाळेबंद आंदोलन छेडणार

पनवेल:
          पनवेल तालुक्यात वारंवार वीज खंडित होण्याची समस्या जटिल झाली आहे. एकीकडे कडक उन्हामुळे घामाच्या धारा अन दुसरीकडे विजेचा खेळखंडोबा यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. पनवेलच्या शहरी भागासह ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून भरदिवसा विजेचा लपंडाव होत असून रात्री अपरात्री देखील वीज खंडित होत आहे. त्यामुळे विजेच्या या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या धर्तीवर पनवेल जिल्हा काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज (बुधवार दि.१४ जून) पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भिंगारी येथील महावितरणच्या कार्यालयाला धडक देऊन पनवेलमध्ये होत असलेल्या वारंवार खंडित विजपुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांना घेराव घातला. 


  यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांना पनवेलमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तसेच पनवेलमध्ये अखंडित विद्युत पुरवठा देण्याबाबत महावितरणचे नियोजन समजावून घेण्याच्या उद्देशाने लवकरात लवकर बैठक देण्याची मागणी करीत त्या संदर्भात निवेदनही दिले. महावितरणने याबाबत समाधानकारक उपाययोजना न केल्यास पनवेल जिल्हा काँग्रेस रस्त्यावर उतरून टाळेबंद आंदोलन करेल व अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही, असा सज्जड इशाराही यावेळी देण्यात आला.   या निवेदनात म्हंटले आहे की, पनवेल महानगरपालिका हद्दीमधील बहुतांश विभागांमध्ये जवळपास दोन महिने एकही दिवस २४ तास अखंडित वीजपुरवठा देण्यात महावितरण आस्थापना असमर्थ ठरली आहे. तांत्रिक अडचणींमुळे अथवा मान्सूनपूर्व तयारीमुळे महावितरण कार्यालयाकडून काहीतरी विधायक कामे सुरू असल्याचे गृहीत धरून आम्ही आजपर्यंत आपणासोबत पत्रव्यवहार केला नाही. परंतु क्षेत्रपरिघातील नागरिकांच्या वाढत्या तक्रारी पाहता अखंडित वीजपुरवठा देण्यात आपण असमर्थ ठरत आहात हे दिसून येते.

उपभोक्त्यांच्या विज देयक थकीत प्रकरणात ज्या परखडतेने आपले कार्यालय काम करते ती परखडता विद्युतप्रवाह खंडित झाला असता दुर्दैवाने दिसून येत नाही. थकित वीज देयक उपभोक्त्यांना आरेरावीयुक्त फोन कॉल करणारे आपले कर्मचारी अशा वेळी त्यांचे फोन बंद करून बसतात हे निषेधार्ह आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील तसेच शेजारील तालुका क्षेत्रातील उपभोक्त्यांना अखंडित वीजपुरवठा पुरविण्याच्या दृष्टीने आपले कार्यालय काय हालचाली करत आहे? याची परिसरातील नागरिकांना माहिती देणे हे आपले परम कर्तव्य आहे. दुर्दैव हे आहे की अशा स्वरूपाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांना आपल्याकडून "शून्य" प्रतिसाद प्राप्त होतो. योगायोगाने एखाद्या अधिकाऱ्यांशी संपर्क झालाच तर महावितरणचे काम करत आहोत म्हणजे "नागरिकांवरती उपकार करत आहोत" अशा अविर्भावात मग्रूर उत्तरे ऐकावी लागतात. करदात्या नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच अखंडित वीज पुरवठा देणे ही आज काळाची गरज बनली आहे. अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर देखील खंडित वीजपुरवठा देऊन उपभोक्त्यांना त्रास देण्याचे कर्म आपले कार्यालय करत असेल तर इन्व्हर्टर व्यवसाय करणाऱ्यांच्या सोबत आपले आर्थिक संबंध असल्याचा संशय प्राप्त होतो; किंबहुना त्यांच्या व्यवसाय वृद्धीकरिता आपण सातत्याने वीजपुरवठा खंडित करत असल्याचा नागरिकांमध्ये दाट संशय आहे. आठवडाभरात काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळासोबत अखंडित वीज पुरवठा नियोजन कसे असेल? या एकाच मुद्द्यावरती बैठक अभिप्रेत आहे. बैठक न दिल्यास उग्र आंदोलन करण्याचे संविधानिक हत्यार उपसावे लागेल, असा इशारा पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्यासह उपस्थित शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. याप्रसंगी माजी नगरसेविका शशिकला सिंह, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नौफिल सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष कांती गंगर, अमित लोखंडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष नीता शेनॉय, युवक काँग्रेस प्रवक्ते अरुण ठाकूर, कल्पेश गंगर यांच्यासह आदी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने