पनवेल दि. १३ (संजय कदम) : नवीन पनवेल परिसरात विजेचा लपंडाव सुरु असून यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. या त्रासापासून नागरिकांची लवकरात लवकर सुटका करावी या मागणीसाठी शिवसेना (उद्दव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या शहर संघटिका अपूर्वा प्रभू यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पनवेल एमएसईबीच्या भिंगारी येथील कार्यालयाला धडक दिली. यावेळी एमएसईबीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर श्री सरोदे यांनी महिलांची कैफियत ऐकून घेऊन लवकरात लवकर वीज सुरळीत करण्याची ग्वाही दिली.
यावेळी नवीन पनवेल महिला शहर संघटक अपूर्वा प्रभू यांच्यासह नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, उपविभाग प्रमुख राजेश वायंगणकर, उपतालुका संघटिका सुगंधा शिंदे, उपशहर संघटक मालती पिंगळा, विभाग संघटक वैशाली थळी यांच्यासोबत परिसरातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अपूर्वा प्रभू यांनी विजेच्या लपंडावाबाबत एमएसईबीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर श्री सरोदे यांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, नविन पनवेल प्रभाग १६ च्या सेक्टरमध्ये सतत लाईट जात असते. याबद्दल एमएसईबी कार्यालयात विचारल तर उकाड्यामुळे लोकं एसी लावतात आणि त्याचा येणारा लोड इलेक्ट्रिक यंत्रणा पेलवू शकत नाही अशी भंपक उत्तरे देतात. जेंव्हा शहर बनत असतं तेव्हा पाणी, वीज, रस्ते ह्याचे प्रयोजन अगोदर केले जाते. आज वर्षानुवर्ष सिडको वसाहत वाढत आहे. हिच परिस्थिती गेल्या वर्षी होती.
मग मधल्या वेळात प्रयोजन का झालं नाही? विजेची समस्या असताना नविन इमारत बनत आहेत. हया सर्वा साठी कोण जबाबदार? नागरिकांचे उकाड्याने हाल होत आहेत. घरातून कामं करणाऱ्यांची कामं होत नाहीत. आता पावसाळा सुरू होईल तर त्यावर तुमची ठराविक उत्तर असतात. ह्या सर्वातून नागरिकांची सुटका कशी आणि कधि होणार आहे? असा प्रश्न अपूर्वा प्रभू यांनी निवेदनाद्वारे विचारला आहे.
Tags
पनवेल