पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ परिसरामधील खदाणीत काकाचा खून करून पळून गेलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलीसांनी अथक प्रयत्नानंतर अटक केली आहे. २०१६ पासून या आरोपीचा पोलीस शोध घेत होते. नितिन ठाकरे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरिक्षक पदाचा भार स्विकारल्यानंतर ज्या प्रकरणातील आरोपी अनेक वर्षे फरार आहेत, अशा प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी खास पथक स्थापन केले होते.
पोलीस उपनिरिक्षक अभयसिंग शिंदे हे या पथकाचे प्रमुख होते. या पथकाने आरोपी नगीना उर्फ चंकी पांडे (रा. उत्तर प्रदेश) याचा शोध घेतला. गेली ७ वर्षे स्वतःची ओळख लपवून चंकी सासरी राहत होता. नावाव्यतिरिक्त चंकीचे कोणतेही छायाचित्र पोलीसांकडे नव्हते. मोबाईल नंबरही नसल्याने त्याला शोधणे कठीण झाले होते. उत्तरप्रदेश राज्यातील बरीया या गावी डोंगराळ भागात तो राहत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीस अधिकारी ठाकरे यांनी अभयसिंह शिंदे, हवालदार परेश म्हात्रे, पोलीस नाईक रवींद्र पारधी, पोलीस शिपाई साईनाथ मोकळ यांचे पथक उत्तर प्रदेशला पाठविले. या पथकाने वाराणसी येथील स्पेशल टास्क फोर्स व स्थानिक हलिया पोलीस यांच्या सहाय्याने आरोपी नगीना उर्फ चंकी पांडे याला ताब्यात घेतले. या घटनेनंतर पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी पोलीस अधिकारी नितिन ठाकरे व पथकाचे कौतुक केले.
Tags
पनवेल