विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळाचा सन्मान
बारा वर्षे हरिनामाचा सुरू आहे जागर
रसाळ दर्शन सेवाभावी ट्रस्टच्या वतीने सेवा पुरस्कार प्रधान
पनवेल/ प्रतिनिधी:- कामोठे येथील विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळाने आपल्या भजन रुपी सेवेची तपपुर्ती केली आहे. तब्बल बारा वर्षे बारा जणी भागवत धर्माचा आपल्या सेवेतून प्रचार आणि प्रसार करत आहेत . त्यांच्या या कार्याबद्दल रसाळ दर्शन सेवाभावी ट्रस्टच्या वतीने यावर्षीचा सेवा सूर्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
हरिनामाच्या या जागरामध्ये पुरुषांबरोबरच आता महिलांचाही सहभाग वाढू लागला आहे. कामोठे येथील विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ 2011 पासून भजन सेवा देत आहे. एकूण बारा महिला भगिनी या मंडळात असून हार्मोनियम, टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये तब्बल एक तप हरिनामाचा जप करीत आहेत. पनवेल परिसरामधील वेगवेगळ्या हरिनाम सप्ताहामध्ये संगीत भजनाच्या माध्यमातून हरी जागर करण्यामध्ये कामोठे येथील हे महिला भजनी मंडळ सातत्याने अग्रेसर राहिलेले आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये आपली भजन सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करण्यामध्येही हे महिला भजनी मंडळ मागे राहिले नाही.
आपल्या भजन सेवेमध्ये भक्ती व भावगीतांबरोबरच गवळणीच्या माध्यमातून ईश्वरचरणी लीन होणाऱ्या या महिला भजन सम्राज्ञींनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या भजन कलेचे सादरीकरण केले. पनवेल पंचक्रोशी मध्ये त्यांनी एक प्रकारे नावलौकिक प्राप्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळाला सेवासूर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
Tags
पनवेल