खारघर लिटल वर्ल्ड मॉल येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले असून ७ ते ९ नोव्हेंबरदरम्यान सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत ते सुरू राहणार आहे. केंद्र सरकारमार्फत गेल्या नऊ वर्षांत राबवण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम यांच्याबाबत माहिती चित्रे आणि डिजिटल स्वरुपात प्रदर्शित करण्यात आली आहे.
प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास नवी मुंबई टपाल कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक नितीन येवला, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, नायब तहसीलदार संजय भालेराव, पनवेलच्या बालविकास प्रकल्प अधिकारी सुहिता ओव्हाळ, उद्योजक कांतीभाई पटेल, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, केंद्रीय संचार ब्युरोचे पुणे विभागाचे उपसंचालक निखिल देशमुख, प्रसिद्धी अधिकारी हर्षल आकुडे, प्रसिद्धी सहायक पी. कुमार यांच्यासह पनवेल परिसरातील माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ठाणे येथील लोककलावंत बहुउद्देशीय संस्थेच्या कलाकारांनी महाराष्ट्र राज्यगीताचे सादरीकरण केले. यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी संपूर्ण प्रदर्शनात फेरफटका मारून त्याचा आढावा घेतला. त्यांनी आपल्या भाषणात बोलताना केंद्रीय संचार ब्युरोच्या प्रदर्शनाचे कौतुक केले. ते म्हणाले की, गेल्या नऊ वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने अनेक लोकोपयोगी आणि कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ मिळवून अनेक नागरिकांच्या जीवनात आशेचे किरण निर्माण झाले आहेत. या योजनांचा अधिकाधिक लोकांना लाभ घेता यावा यासाठी केंद्रीय संचार ब्युरोच्या मल्टीमीडिया प्रदर्शनाची गरज आहे. असे प्रदर्शन सर्वत्र सातत्याने भरवण्यात यावेत. याच्या मदतीने नागरिकांमध्ये शासकीय योजनांबाबत जनजागृती होऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील
. दरम्यान, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या वेळी परिसरातील आयुष्मान भारत योजना लाभार्थी आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना कार्डचे वितरण करण्यात आले.यानंतर प्रदर्शनात शासकीय योजनांसोबतच भारतीय टपाल विभागांच्या विविध योजना आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने एकात्मिक बालविकास सेवा योजनेमार्फत ’श्री अन्न रेसिपी’संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. भरडधान्यांचा वापर करून बनवण्यात आलेल्या चवदार पदार्थांचा आस्वाद या वेळी उपस्थितांनी घेतला. प्रदर्शनस्थळी लावण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियान संदर्भात सेल्फी पॉईंटला प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळाला. यासोबतच प्रदर्शनस्थळी पनवेल तहसील कार्यालयामार्फत मतदार नोंदणी शिबिर घेण्यात येत असून परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Tags
पनवेल