पनवेल (प्रतिनिधी) गतिमंद मुलांची नामांकित शाळा म्हणून ओळख असलेल्या सुहीत जीवन ट्रस्ट पेण येथे बालसंरक्षण, सतर्कता व सुरक्षितता अभियान, 2024 हा जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न झाला. सध्याची परिस्थिती, सामाजिक मानसिकता याचा विचार करून संस्थेने हा अत्यंत उपयुक्त व अनोखा जनजागृतीपर उपक्रम आयोजित केला होता.
यावेळी व्यासपीठावर रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, बाल न्यायमंडळ रायगड, सदस्या डॉ. नीता कदम, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. मंगेश नेने, पेण वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप बागुल, सिद्धि प्रिंटर्सचे मालक भूषण पाठक इत्यादी मान्यवरांसमवेत कार्यक्रमाच्या आयोजक सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ.सुरेखा पाटील व सचिव श्री. वरूण पाटील यादेखील उपस्थित होत्या.
यावेळी पोलिस अधिक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी बोलताना खाकी वर्दीतला पालक या नात्याने सुहित जीवन ट्रस्टच्या गतिमंद मुलांशी अत्यंत जिव्हाळ्याचा सुसंवाद साधला. तसेच सर्व पोलिस आपले पाठीराखे आहेत याची या कार्यक्रमातून जाणीव करून दिली. एवढेच नव्हे तर समाजातील सर्वच स्तरात सावधानता, संवेदनशीलता व सतर्कता असणे गरजेचे आहे हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. तसेच समाजात चुकीचे वागणाऱ्यांची कधीच गय केली जाणार नाही असाही सज्जड दम देण्यात आला. बालसंरक्षण, सतर्कता, सुरक्षितता व निर्भयता याबद्दल श्री. घार्गे यांनी उपस्थित महिला, विद्यार्थीनी, पालक व शिक्षक यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
संस्था समर्थपणे व सक्षमतेने गेली २० वर्षे या विशेष मुलांसाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले, तसेच संस्थेचे कार्य पाहून मी अतिशय भारावून गेलो असेही गौरवोद्गार श्री. घार्गे यांनी व्यक्त केले.सुहित जीवन ट्रस्ट ने पुढाकार घेऊन असा संवेदनशील उपक्रम हाती घेतल्याबद्दल सर्वच स्तरावरुन त्यांच्या समायोचीत कामगिरी बद्दल कौतुक कऱण्यात येतं आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या शिक्षिका अपर्णा जाधव यांनी केले.
Tags
पनवेल